शिंदेंना खुर्ची सोडावी लागली तर भावी मुख्यमंत्री कोण?, अजित पवार की जयंत पाटील, चर्चेला उधाण | पुढारी

शिंदेंना खुर्ची सोडावी लागली तर भावी मुख्यमंत्री कोण?, अजित पवार की जयंत पाटील, चर्चेला उधाण

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सत्तासंघर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुर्ची सोडावी लागली तर भावी मुख्यमंत्री कोण या मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष आणि ‘मविआ’तील ठाकरे शिवसेनेबरोबर आता राष्ट्रवादी काँग्रेसही उघडपणे मैदानात उतरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपले पत्ते खुले केले असताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समर्थकांनीही त्यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केले आहे. त्यामुळे ‘खुर्ची एक आणि दावेदार अनेक’ अशी स्थिती असून गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यादिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, असे विधान पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केल्यामुळे पक्ष संघटनेतील बदलांपासून ते भावी मुख्यमंत्रिपदापर्यंत दावे-प्रतिदावे राष्ट्रवादीमध्ये सुरू झाले आहेत. एकीकडे भाजपसोबत हातमिळवणी करत विरोधी पक्षनेते अजित पवार मुख्यमंत्रिपदापर्यंत जवळ जवळ पोहोचल्याचे चित्र राज्यभर लागलेल्या पोस्टर्सनी निर्माण केले असतानाच आता माजी मंत्री जयंत पाटील यांचीही मुख्यमंत्रिपदाची उमेदवारी खा. अमोल कोल्हे यांनी जाहीर करून टाकली.

भाकरी फिरवण्याची वेळ : शरद पवार

शरद पवारांनी भाकरी फिरवण्याची सुरुवात केली असतानाच गुरुवारी मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत अजित पवारांच्या विरोधात जयंत पाटील यांचे नाव उतरवले गेले. महिनाभरापूर्वी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर भावी मुख्यमंत्री म्हणून आधी अजित पवार, पाठोपाठ सुप्रिया सुळे यांची पोस्टर्स लागली होती. तिसरे पोस्टर होते जयंत पाटील यांचे. नंतर ही पोस्टर्स काढण्यात आली. आता महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल कोणत्याही क्षणी लागण्याची चिन्हे असताना अजित पवार भाजपसोबत हातमिळवणी करून मुख्यमंत्री होऊ शकतात या चर्चेने जोर धरला असतानाच जयंत पाटील यांच्यासारख्या नेत्याची महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून गरज आहे, असे विधान करून खा. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीतील सत्तासंघर्षाला जाहीरपणे तोंड फोडले.

अनेक पदाधिकारी काही वर्षांपासून एकाच पदावर ठाण मांडून बसल्याने विविध सेलचे कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांना मुख्य प्रवाहात संधी मिळत नाही. आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, असे बदलाचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चेंबूरमध्ये झालेल्या युवा मंथन शिबिरात बुधवारी दिले. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी पक्षात मोठे मंथन सुरू झालेले दिसते आणि त्या दिशेने राष्ट्रवादीतील प्रबळ गट-तट कामालाही लागले आहेत.

आमदारकीच्या जागा तरुणांसाठी मागितल्या तेव्हा मी फक्त 26 वर्षांचा होतो. 27 व्या वर्षी पहिल्यांदा आमदार झालो याची आठवण करून देत शरद पवारांनी पक्षाची धुरा तरुणांच्या हाती सोपवण्याचीच तयारी केल्याचे आता सांगितले जाते. राष्ट्रवादीतील सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार, सुप्रिया सुळे किंवा जयंत पाटील यांच्यात राष्ट्रवादीचे नेतृत्व मिळवण्यावरून शीतयुद्ध सुरू असताना या तिघांना मागे टाकत आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार पुढे सरकू शकतात. त्यामुळेच राज्य विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रथमच रोहित पवार यांची शिफारस केली आहे. सरकारने ही समिती स्थापन करण्याच्या हालचाली सुरू करताच राष्ट्रवादीकडून रोहित पवारांचे नाव सुचवले गेले. विशेष म्हणजे मित्रपक्षाशी चर्चा करून यासंदर्भात अंतिम निर्णय होणार असला तरी रोहित पवारांचे नाव सुचवून राष्ट्रवादीने त्यावर जवळजवळ शिक्कामोर्तब केले आहे.

पवारांचे भाकरी फिरवण्याचे वक्तव्य नव्या चेहर्‍यांना संधी देण्यासाठी : अजित पवार

‘गेल्या 55-60 वर्षांच्या राजकीय जीवनात शरद पवार यांनी काही प्रसंग पाहून भाकरी फिरवण्याचे काम केले आहे. बुधवारचे त्यांचे वक्तव्यही नव्या चेहर्‍यांना संधी देण्याच्या हेतूने असावे’, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. त्याचवेळी खा. अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील यांच्याबद्दलच्या वक्तव्यावर ‘शुभेच्छा आहेत’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, पक्षात नवे लोक पुढे आले. हे सगळ्यांनी पाहिले आहे. आम्हाला संधी मिळाली, आम्ही काम दाखवून दिले. नवीन कार्यकर्ते आले पाहिजेत. नवे चेहरे आले पाहिजेत. नवनवीन लोक पुढे येत असतात. काहीजण वयस्कर झाल्यावर बाजूला जातात. या घटना घडत राहतात.

शरद पवार जो निर्णय घेतील, तो सर्वांना मान्य : जयंत पाटील

खासदार अमोल कोल्हे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर जयंत पाटील म्हणाले, अजित पवार यांच्या नेतृत्वात विधिमंडळात 54-55 आमदार आहेत. आमचा पक्ष कसा वाढेल यावर आमचे लक्ष आहे. शरद पवार जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल. जोपर्यंत आमचा नंबर येत नाही, तोपर्यंत बाकी चर्चा करण्यात अर्थ नाही. नंबर आल्यावर यावर एकमताने चर्चा होईल. पण आमच्यात कोणताही वाद नाही. खासदार अमोल कोल्हे यांनी केलेले ते विधान प्रतीक पाटील आणि माझ्या कौतुकासाठी होते. मात्र, त्यात वेगळा उद्देश काही नाही. अजितदादा आणि माझ्यात किंवा पक्षात कोणाशीही स्पर्धा नाही. पोस्टरबाजी आणि मागणी ही कार्यकर्त्यांच्या भावना आणि अमोल कोल्हे यांचे केवळ मत एवढ्यापुरत्याच या गोष्टी मर्यादित आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Back to top button