समुद्रात दहा वर्षांपासून तरंगत होती चिठ्ठीची बाटली! | पुढारी

समुद्रात दहा वर्षांपासून तरंगत होती चिठ्ठीची बाटली!

कॅनबेरा : सध्या समुद्रातील प्लास्टिकचा कचरा जगाच्याच चिंतेचा विषय बनलेला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी असा कचरा हटवण्याचे काम सुरू असते. ऑस्ट्रेलियातील अशाच बीच क्लिनिंग क्रू मेंबर रॉस इव्हान्स यांना बीच साफ करताना एक बाटली सापडली. सागरी कचर्‍यात प्लास्टिकच्या बाटल्या सापडणे हे काही नवीन नाही; पण या बाटलीत क्रूला एक पत्र सापडले. जेव्हा क्रूमधील रॉस इव्हान्सने या बाटलीतून पत्र काढले आणि ते वाचले तेव्हा त्याला फार कुतुहल वाटलं.

कारण हे पत्र एका लहान मुलीने लिहिलेलं होतं. या पत्रात लिहिले होते- ‘माझे नाव इनेस झॅपकॅन आहे, मी 8 वर्षांची आहे, ज्याला ही बाटली मिळेल त्याला माझ्या आणि माझ्या कुटुंबाकडून त्यांच्या आयुष्यासाठी शुभेच्छा.‘हा गोंडस संदेश वाचल्यानंतर इव्हान्सला इन्स्टाग्रामवर झॅपकॅन सापडली आणि ती आता 18 वर्षांची झाली आहे. म्हणजेच तिचा हा संदेश तब्बल 10 वर्षांपासून समुद्रात तरंगत होता. ‘मी ही बाटली 10 वर्षांपूर्वी पोर्टलँड, व्हिक्टोरिया येथे सोडली होती,’ असे झॅपकॅनने इव्हान्सला इन्स्टाग्राम चॅटमध्ये सांगितले.

‘मला माफ करा मी पत्रासह एक दशलक्ष पाऊंड पाठवू शकले नाही, परंतु मला खूप आनंद झाला आहे,’ पुढे ती म्हणाली, यामुळे माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या अनेक आठवणी ताज्या झाल्या. या बाटलीने 10 वर्षांत समुद्रात 50 मैलांचा प्रवास केला होता. झॅपकॅन म्हणाली की ही 10 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे; पण आता मी समुद्रातील प्लास्टिक प्रदूषणाबद्दल अधिक जागरूक आहे.

Back to top button