जालना : परतुरात डॉक्टर दांम्‍पत्याला रुग्णाकडून मारहाण | पुढारी

जालना : परतुरात डॉक्टर दांम्‍पत्याला रुग्णाकडून मारहाण

परतूर ; पुढारी वृत्‍तसेवा येथील तिरुपती हॉस्पिटलमध्ये काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रुग्णाकडून आरडाओरड करून रुग्णालयातील कर्मचारी व डॉक्टर पुरी पती-पत्नीला मारहाण करण्यात आली. यावेळी रुग्णालयाच्या काचाही फोडण्यात आल्‍याची घटना घडली. या प्रकरणी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरून ॲट्रोसिटीसह नुकसान करून मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, डॉक्टर पुरी यांचे तिरुपती हॉस्पिटलचे कर्मचारी चंदा लखन हिवाळे यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि २५ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास डॉ. लता पुरी यांच्या तिरुपती हॉस्पिटलमध्ये स्वीपरचे काम करीत असतांना डोक्याला मार लागलेला इसम यश अनिल गिरी रा. परतुर हा दवाखान्यात आला. तो आरडाओरडा करित होता. यावेळी रुग्णालयातील कर्मचारी महिला त्‍याचे ओरडणे पाहून म्हणाल्या की, आरडाओरडा का करत आहे. असे म्हणताच यश गिरी याने बुक्की मारुन खाली पाडले. त्यानंतर त्याने डॉ. लता पुरी यांच्या केबीनला बुक्की मारुन काच फोडली. सोबत असलेल्या महिला कर्मचारी त्यास समजावुन सांगत असतांना यश गिरी यांनी महिलांना जातीवाचक शिवीगाळ करून अंगावर धावुन आला.

दवाखान्यात असलेल्‍या एका पेशंटचे नातेवाईक केशव भुजंगराव बरकुले हे यावेळी त्‍याला शांत करण्यासाठी आले असता, यश गिरी याने हातातील कड्याने केशव बरकुले यांच्या डोक्यात मारहाण करून त्‍यांना जखमी केले. तेवढ्यात रुग्णालयात गोंधळाचा आवाज आल्याने डॉ लता पुरी, डॉ.संजय पुरी दोघेजण वरच्या मजल्यावरुन खाली आले. त्यावेळी यश गिरी याने काही एक न बोलता सरळ डॉ. लता पुरी यांच्या अंगावर धावून जात त्यांना मारहाण केली. त्यानंतर डॉ संजय पुरी हे यश गिरी यास समजावुन सांगत असतांना यश याने मेडीकल जवळील रस्त्यावर डॉ. संजय पुरी यांची कॉलर पकडून बुक्याने डोक्यात मारहाण केली.

यावेळी लोक जमल्याने यश अनिल गिरी हा त्या ठिकाणावरुन निघुन गेला. या प्रकरणी चंदा हिवाळे यांच्या फिरयादीवरून यश अनिल गिरी यांच्या विरुद्ध ॲट्रोसिटीसह मारहाण करून नुकसान केल्या प्रकरणी दि. २५ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आर.डी. मोरे हे करीत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button