सोलापूर : मोटारसायकलचा धक्का दिल्याचा जाब विचारल्याने कोयत्याने मारहाण, जीवे मारण्याची धमकी देत गोळीबार | पुढारी

सोलापूर : मोटारसायकलचा धक्का दिल्याचा जाब विचारल्याने कोयत्याने मारहाण, जीवे मारण्याची धमकी देत गोळीबार

टेंभुर्णी; पुढारी वृत्तसेवा : मोटारसायकलचा धक्का का दिला याचा जाब विचारल्याचा राग आल्याने पाच जणांनी मिळून एकास कोयत्याने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर जिवे मारण्याची धमकी देत हवेत गोळीबार केल्याप्रकरणी टेंभुर्णी पोलिसांनी अवघ्या काही तासात चार आरोपींना पकडून ताब्यात घेतले. ही गंभीर घटना बेंबळे येथे शनिवारी (दि. २२) सायंकाळी ७:४५ च्या सुमारास घडली. याबाबत शरद रामचंद्र कोळी (वय ३५ रा.बेंबळे ता.माढा) यांनी या घटनेची फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार सोमनाथ भारत कांबळे, शंकर लक्ष्मण कांबळे, तेजस संजय कांबळे, वैभव नामदेव कांबळे (सर्व रा.बेंबळे ता.माढा जि.सोलापूर) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.तर भैय्या सुनील ताकतोडे हा फरार झाला आहे.

या गुन्ह्याबाबत अधिक माहिती अशी की, शरद कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार शनिवारी (दि.२२) सायंकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास बेंबळे गावातील वेताळवाडी चौकातील गणपती मंदिराजवळ आरोपी सोमनाथ भारत कांबळे (रा.बेंबळे ता.माढा) यांना मुलगा रुद्रा याला मोटरसायकलचा धक्का का दिला अशी विचारणा केली. यावर सोमनाथ कांबळे यांनी त्यांना शिवीगाळ, दमदाटी करुन कोयत्याने मारहाण केली. यात ते किरकोळ जखमी झाले. तसेच भैय्या सुनिल ताकतोडे, शंकर लक्ष्मण कांबळे, तेजस संजय कांबळे, वैभव नामदेव कांबळे यांनी देखील शिवीगाळी, दमदाटी करुन लाथा-बुक्क्याने मारहाण केली. शंकर कांबळे याने त्याच्या हातातील पिस्तूल मधील हवेत एक गोळीबार केला. त्याचबरोबर फिर्यादी कोळी यांचे चुलत भाऊ गणपत कुर्मूदास कोळी, रावसाहेब दत्तात्रय कोळी यांना देखील पिस्तुलाचा धाक दाखवून शिवीगाळ, दमदाटी करुन त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी डीवायएसपी डॉ.विशाल हिरे, सोलापूर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप व त्यांचे पथक, पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी भेट दिली. गुन्हा दाखल होताच पोलीस डीबी पथकाचे उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, पोना विनोद साठे, पोकॉ कांबळे, पिहेकॉ माने-देशमुख, पोकॉ इंगोले, पोना भानवसे, चालक पोहेकॉ क्षिरसागर, पोकॉ खंडागळे यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींची माहिती मिळवून लपून बसलेल्या चार आरोपींना पकडून बेड्या ठोकल्या आहेत. तर भैय्या सुनील ताकतोडे हा फरार झाला आहे. याबाबत पोसई कुलदीप सोनटक्के यांनी गुन्हा दाखल करून घेतला असून सपोनि गिरीष जोग हे अधिक तपास करीत आहेत.

Back to top button