संगमनेर : पोलिसांनी जप्त केले 400 किलो गोमांस | पुढारी

संगमनेर : पोलिसांनी जप्त केले 400 किलो गोमांस

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : पोलिस उपाधीक्षकांच्या पथकाने केलेल्या कारवाईनंतर दुसर्‍याच दिवशी संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने मदिनानगर येथील बेकायदेशीर चालणार्‍या कत्तलखान्यावर छापा टाकून 400 किलो गोवंशाच्या मांसासह अलिशान फोर्ड कंपनीची कार असा एकूण साडेतीन लाखांचा मुद्दे माल जप्त केला.

संगमनेर शहरातील मदिनानगर भागातील एका मोठ्या इमारतीच्या पाठीमागील बाजूच्या आडोशाला गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याची गुप्त माहिती एका खबर्‍यामार्फत पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांना समजली असता पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी घटना स्थळावरुन साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी पोलिस शिपाई विवेक जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आमीन कादीर अन्सारी याच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण आणि गोवंश हत्याबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ कॉन्स्टेबल सचिन उगले हे करत आहे. पोलिस उपाधीक्षकांच्या विशेष पथकाने एक दिवस अगोदर कारवाई केली. त्यानंतर शहर पोलिसांनी दुसर्‍या दिवशी लागलीच कारवाई केली. त्यामुळे पोलिस उपाधीक्षकांचे पथक आणि शहर पोलिसांमध्ये समन्वय नसल्याचे या दोन्ही कारवायांवरून उघड होत आहे.

Back to top button