कोल्हापूरकरांसाठी खूशखबर..! अक्षय तृतीयेपासून धावणार एसटीच्या १५ जादा बस | पुढारी

कोल्हापूरकरांसाठी खूशखबर..! अक्षय तृतीयेपासून धावणार एसटीच्या १५ जादा बस

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मिनी कोल्हापूर अशी ओळख असलेल्या डिलाईड रोड परिसरातील नागरिकांना अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर एसटी महामंडळाने खास गिफ्ट दिले आहे. दै. पुढारीने विषय लावून धरल्याने जाग आलेल्या एसटी महामंडळाने २२ एप्रिलपासून डिलाईड रोड येथून कोल्हापूरकरीता १५ एसटी बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ‘पुढारी’च्या पाठपुराव्यामुळे चंदगड, राधानगरी, हत्तीवडे, कागल, नेसरी, गारगोटी, गार-पाटगाव या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबईचा मध्यवर्ती भाग असलेल्या डिलाईड रोड, करीरोड, परेल या भागात पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांची संख्या मोठी आहे. परंतु येथून महामंडळची एकही एसटी धावत नसल्याने या नागरिकांना नाईलाजाने खाजगी ट्रॅव्हल्सने जादा पैसे मोजून प्रवास करावा लागतो. त्यामुळे येथील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून एसटीची मागणी करत आहेत. या संदर्भात विधीमंडळातही अनेक आमदारांनी प्रश्न उपस्थित केला होता. परंतू फक्त आश्वासनच मिळत होते. पुढारीने हा विषय सातत्याने लावून धरला. अखेर २२ एप्रिलपासून २२ एप्रिलपासून कोल्हापूरकरांसाठी १५ एसटी सोडण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.

प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास आणखी १० बस सोडण्यात येणार आहेत. परळ आणि मुंबई सेंट्रल बस स्थानकातून सुटणाऱ्या एसटी बस डिलाईल रोड, भारतमाता चौक मार्गे जाणार जाणार आहेत. सायंकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत या गाड्या सुटणार आहेत. साधी, हिरकणी, शिवशाही आणि शयन आसनी या प्रकारातील या बस आहेत. विशेष म्हणजे शयन आसनी फुल्ल झाल्या आहेत. तर इतर गाड्यांच्या २५ ते ३८ सीटचे बुकींग झाले आहे.

Back to top button