समुद्रात दहा लाख चौ. कि.मी. क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कचरा | पुढारी

समुद्रात दहा लाख चौ. कि.मी. क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कचरा

वॉशिंग्टन : समुद्रात फैलावलेला कचरा हा जागतिक चिंतेचा विषय बनलेला आहे. समुद्रात हा कचरा इतका साठलेला आहे की प्लास्टिकच्या एखाद्या बेटासारखीच स्थिती निर्माण झाली आहे. वैज्ञानिकांनी कॅलिफोर्निया आणि हवाईदरम्यान समुद्रात दहा लाख चौरस किलोमीटर क्षेत्रात कचर्‍याचा विशाल साठा शोधून काढला आहे. त्यावर अनेक खेकडे आणि अन्य काही सागरी जलचरही आढळून आले. हे जलचर आपल्या मूळ अधिवासापासून हजारो किलोमीटर अंतरावर होते.

नेचर इकॉलॉजी अँड इव्होल्युशन जर्नलमध्ये याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. जलचरांच्या अनेक प्रजाती समुद्रात तरंगत असलेल्या कचर्‍यावर जगत आहेत. हा प्लास्टिक कचरा काही सागरी प्रजातींसाठी नवा तरंगता अधिवास बनला आहे. काही जीव सामान्यपणे खुल्या समुद्रात जिवंत राहण्यास सक्षम नसतात.

त्यामुळे अशा काही जीवांसाठी मात्र हा तरंगता कचरा नवा अधिवास बनला आहे. साधारणपणे किनारपट्टीलगत आढळणार्‍या अशा प्रजाती तरंगत्या प्लास्टिक कचर्‍यावर मोठ्या प्रमाणात दिसून आल्या. संशोधिका लिन्से हरम यांनी सांगितले की अशा प्रजातींपैकी 70 टक्के या कचर्‍यावर दिसून आल्या. संशोधकांनी नोव्हेंबर 2018 ते जानेवारी 2019 या काळात प्लास्टिक कचर्‍याच्या 105 वस्तूंची तपासणी केली. त्यावर 46 वेगवेगळ्या प्रजातींचे जीव आढळून आले.

संबंधित बातम्या
Back to top button