पुणे : विमानातून उतरताना विमान कंपनीच्या कर्मचार्‍याचा मृत्यू, पाय घसरून पडल्याची प्राथमिक माहिती | पुढारी

पुणे : विमानातून उतरताना विमान कंपनीच्या कर्मचार्‍याचा मृत्यू, पाय घसरून पडल्याची प्राथमिक माहिती

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे- दिल्ली दरम्यान उड्डाणासाठी सज्ज असलेल्या विमानातून उतरताना पाय घसरून एअर एशिया कंपनीच्या कर्मचार्‍याचा मृत्यू झाला आहे.

पुणे विमानतळावर गुरूवारी सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी ही घटना घडली. विविन अँथनी डॉमेनिक (वय 34, रा. लोहगाव) असे मृत्यू झालेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे. पुणे विमानतळावर एअर एशिया या विमान कंपनीसाठी सुरक्षा एजंट म्हणून हा कर्मचारी काम करत होता. सकाळी विमानात प्रवासी चढल्यानंतर हा कर्मचारी विमानातून खाली उतरत होता. त्यावेळी त्याला पायर्‍या न सापडल्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघात झाल्यानंतर या कर्मचार्‍याला तातडीने सह्याद्री रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

विमानतळावर घडलेल्या या घटनेमुळे विमानतळावरील अत्यावश्यक वैद्यकीय सुविधांची आवश्यकता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीची वैद्यकीय सेवेची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी होत आहे.

विमानतळावर घडलेली घटना दुर्दैवी आहे. विमान कंपनीच्या कर्मचार्‍याचा अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनेची चौकशी सुरू आहे. चौकशी अंती याबाबत सांगता येईल.
– संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

पुणे विमानतळावर अशी घटना पहिल्यांदाच घडलेली आहे. कुठेतरी हलगर्जीपणा, छोटीशी चूक किंवा मिस कम्युनिकेशन झाले असणार आहे. या कर्मचार्‍याला विमानतळावरच तातडीची वैद्यकीय सेवा मिळायला हवी होती. असे झाले असते तर कदाचित त्याचा जीव वाचू शकला असता. मी अनेकदा विमानतळावर तातडीची वैद्यकीय सेव उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न केले आहेत आणि अजूनही आमचे प्रयत्न सुरू आहेत.
– धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ञ

Back to top button