भांडण सोडविल्याच्या गैरसमजुतीने तरुणाचा खून ; आरोपींना गुन्हे शाखेकडून बेड्या | पुढारी

भांडण सोडविल्याच्या गैरसमजुतीने तरुणाचा खून ; आरोपींना गुन्हे शाखेकडून बेड्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भांडण सोडविल्याच्या गैरसमजुतीतून तरुणावर वार करून पसार झालेल्या आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट चारने अटक केली. उपचारादरम्यान जखमी तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्याविरुद्ध खुनाच्या कलमाची वाढ करण्यात आली आहे.
शंतनु शिवराज चाटे (वय 19 रा. साई गणेश सोसायटी, आळंदी) याला अटक केली आहे. त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. दिलीप बाबूराव हांगे (रा. साई पार्क सोसायटी, आळंदी) हा पसार आहे. अमितकुमार विश्वकर्मा (वय 21, रा. लोहगाव ) असे खून केलेल्याचे नाव आहे. लोहगावमध्ये 7 एप्रिलला अमितकुमार रस्त्याने चालला होता.

त्या वेळी एमआयटी कॉलेजच्या समोर वडगांव-शिंदे रस्त्यावर चार- पाच जण भांडण करीत होते. त्यामुळे अमितकुमार घाबरून पळून जात असताना शंतनू आणि इतरांना त्याने भांडण सोडविल्याचा गैरसमज झाला. त्यामुळे टोळक्याने पाठलाग करून अडवून अमितकुमार याच्यावर वार करीत गंभीररीत्या जखमी केले. याप्रकरणी तरुणावर वार करणारे लोहगाव परिसरात थांबल्याची माहिती पोलिस अमलदार स्वप्निल कांबळे आणि विनोद महाजन यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. गंभीररीत्या जखमी झालेला अमितकुमार उपचारादरम्यान मृत्युमुखी पडला. त्यामुळे आरोपींविरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा कलमांची वाढ केली. आरोपींना विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कामगिरी, पोलिस निरीक्षक गणेश माने, एपीआय विकास जाधव, संजय आढारी, विठ्ठल वाव्हळ, प्रवीण भालचिम, विनोद महाजन, स्वप्निल कांबळे यांनी केली.

Back to top button