नाशिक : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने एकरी एक लाख नुकसान भरपाई द्यावी : अंबादास दानवे | पुढारी

नाशिक : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने एकरी एक लाख नुकसान भरपाई द्यावी : अंबादास दानवे

ओझर : पुढारी वृत्तसेवा
निफाड तालुक्यासह राज्यात सर्वत्र अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी अक्षरशः उध्वस्त झाला आहे. त्यामुळे सरसकट पंचनामे करून तातडीने एकरी एक लाख नुकसान भरपाई देण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
चांदोरी येथे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुधवार (दि.12) निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांच्या समवेत बाळासाहेब आहेर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या नुकसानग्रस्त द्राक्षबागेची पाहणी केली. त्यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. चांदोरी येथील कांदा उत्पादक सोमनाथ सोनवणे यांच्या कांदा पिकाची पाहणी केली. तसेच उपस्थित शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत त्यांनी द्राक्ष बागेसह कांदा, गहू व भाजीपाला या पिकांचीही यावेळी पाहणी केली. तसेच सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरीत एकरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना साडेतीनशे रूपये प्रति क्विंटल अनुदान देवून थट्टा केली आहे. राज्यात सर्वत्र अवकाळीने शेतकऱ्यावर अस्मानी संकट कोसळले आहे. तरीही शिंदे सरकारला शेतकऱ्यांशी काहीही देणे घेणे नसून डिसेंबरमध्ये जाहीर केलेली मदत अद्याप देखील शेतकऱ्यांना मिळाली नसल्याची टीका करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांच्या समवेत निफाडचे माजी आमदार अनिल कदम, तालुकाप्रमुख सुधीर कराड, चांदोरीचे सरपंच विनायक खरात, माजी सरपंच संदिप टरले, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, महिला आघाडीच्या अध्यक्षा भारती जाधव, सुलभा पवार, करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके पाटील, तहसीलदार शरद घोरपडे, बिडीओ संदीप कराड, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश ढेमसे, सोमनाथ बस्ते, संजय भोज, दौलत टरले, प्रविण कोरडे, संजय कोरडे, रवी आहेर, विष्णु कोरडे, अमर आहेर, अभिजित शिंदे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button