नगर स्पर्धा परीक्षा केंद्राला मिळणार संजीवनी ; आमदार सत्यजित तांबे यांच्याकडून 55 लाखांचा निधी | पुढारी

नगर स्पर्धा परीक्षा केंद्राला मिळणार संजीवनी ; आमदार सत्यजित तांबे यांच्याकडून 55 लाखांचा निधी

नगर : पुढारी वृत्तसेवा :  गरीब, हुशार विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतून चांगले करिअर घडावे, यासाठी 5 एप्रिल 2007 मध्ये महापालिकेने प्रोफेसर कॉलनी चौकात स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले. त्यासाठी प्रशास्त इमारत बांधण्यात आली. मात्र, प्रशासनाच्या उदासिनतेमुळे केंद्र बंद पडले. आता पदवीधरचे आमदार सत्यजित तांबे यांनी त्यासाठी 55 लाखांचा निधी मंजूर केल्याने स्पर्धा परीक्षा केंद्राला संजीवनी मिळणार आहे. महापालिकेने 2007 मध्ये गरीब व होतकरून विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा केेंद्र सुरू केले. कारण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी पुणे, दिल्लीला जावे लागत होते. त्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात.

नगर शहरातील अत्यंत हुशार मुले आहेत. परंतु, हालाखीच्या परिस्थितीमुळे ते शिक्षण घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना महापालिकेच्या स्पर्धा परीक्षा केंद्राचा आधार होता. तत्कालीन महापौर शीला शिंदे यांच्या कार्यकाळात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नवीन इमारत बांधण्यात आली. या केंद्राला स्व. प्रमोद महाजन स्पर्धा परीक्षा केंद्र असे नाव देण्यात आले. स्व. प्रा. एन. बी. मिसाळ यांनी प्रकल्पाचे संचालक म्हणून 11 वर्षे काम पाहिले. हा उपक्रम राबविणारी ही राज्यातील पहिलीच महापालिका होती. मात्र, कोविड काळापासून केंद्राला उतरती काळ लागली. मध्यंतरी तत्कालीन आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केंद्र खासगी तत्वावर चालविण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, त्याचे पुढे काहीच झाले नाही. आताही आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या. मात्र, त्यासाठी अर्थसंकल्पात तरतुद केली नाही.

दरम्यान, नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी 55 लाखांचा निधी मंजूर केला. बुधवारी आमदार तांबे यांनी केंद्राच्या इमारतीची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे व मनपा कर्मचारी उपस्थित होते. आता केंद्र कशा पद्धतीने सुरू करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Back to top button