पुणे : चांदणी चौकातील पुलावर गर्डर टाकले जाणार | पुढारी

पुणे : चांदणी चौकातील पुलावर गर्डर टाकले जाणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : एनडीए चौकातील (चांदणी चौक) भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून (नॅशनल हायवेज अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया – एनएचएआय) करण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या उड्डाणपुलाचे गर्डर टाकण्याचे काम 15 ते 20 एप्रिल या कालावधीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

चौकातील नवा उड्डाणपूल आणि रस्त्यांचे उद्घाटन 1 मे रोजी करण्याचे केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर येथील कामे वेळेवर आणि गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जुन्या पाडलेल्या पुलाच्या ठिकाणी नवीन पूल उभारण्याचे काम वेगाने करण्यात येत आहे. त्यासाठी 15 ते 20 एप्रिल या काळात गर्डर टाकण्याचे काम केले जाणार आहे. हे काम सुरू करण्यापूर्वी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली जाणार आहे. या मार्गाची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.

‘एनडीए चौक परिसरातील नवा उड्डाणपूल आणि तेथील रस्त्यांचा एनएचएआयकडून आढावा घेण्यात आला. त्यानुसार या चौकातील उड्डाणूल आणि रस्त्यांची 90 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. नव्या उड्डाणपुलासाठी आवश्यक खांब उभारणीचे काम पूर्ण झाले असून, 15 ते 20 एप्रिल या कालावधीत उड्डाणपुलाचे गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. मुळशीकडे जाणार्‍या भुयारी मार्गाचे कामही प्रगतिपथावर आहे. याशिवाय बावधन ते सातारा आणि वेदभवन ते मुळशी या रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून, 10 एप्रिलपासून हे रस्ते वाहनधारकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे एनएचएआयकडून सांगण्यात आले.

Back to top button