पुणे : आरटीईची लॉटरी लवकरच; अर्ज पडताळणीचे काम सुरू | पुढारी

पुणे : आरटीईची लॉटरी लवकरच; अर्ज पडताळणीचे काम सुरू

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची ऑनलाइन सोडत येत्या 5 किंवा 6 एप्रिलला जाहीर होणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी दिली आहे. आरटीईनुसार खासगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना 25 टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. या जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फेऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

या प्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता ऑनलाइन अर्ज भरण्याची आणि ते स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, सध्या दुबार किंवा त्रुटी असलेल्या अर्जांची पडताळणी करण्यात येत आहे. राज्यातील 8 हजार 828 शाळांमधील 1 लाख 1 हजार 969 जागांसाठी 3 लाख 65 हजार 82 विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक अर्ज आल्याने कोणत्या विद्यार्थ्यांना सोडतीत प्रवेश मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पालक प्रवेशाची सोडत जाहीर होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

ही प्रवेश प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षण विभागातर्फे तयारी केली जात आहे. सोडत जाहीर झाल्यानंतर प्रवेशाचे सविस्तर
वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. यंदा आरटीईनुसार 25 टक्के आरक्षित जागांसाठी राज्यातून सर्वाधिक अर्ज पुणे जिल्ह्यातून आले आहेत. पुणे जिल्ह्यातील 936 शाळांमधील 15 हजार 655 जागांसाठी 77 हजार 536 अर्ज आले आहेत.

आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी आलेल्या अर्जांची पडताळणी सुरू असून, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच लॉटरी काढण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालय प्रयत्नशील आहे. सोडतीची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.

                                 शरद गोसावी, संचालक प्राथमिक शिक्षण

Back to top button