शेवगाव : गनिमी काव्याने सत्ता काबीज करू : खासदार डॉ. सुजय विखे | पुढारी

शेवगाव : गनिमी काव्याने सत्ता काबीज करू : खासदार डॉ. सुजय विखे

शेवगाव तालुका; पुढारी वृत्तसेवा : शेवगाव बाजार समितीची सत्ता गमिनी काव्याने काबीज करू शकतो. पक्षाने सत्तेसाठी फार संघर्ष केलेला आहे. त्यामुळे आपसांत भांडत बसू नका. शासनाने व लोकप्रतिनिधीने केलेल्या कामांचा प्रचार करा. युवक व निष्ठावतांना प्राधान्य द्या, असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात आयोजित भाजप, शिवसेना व मित्रपक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आमदार मोनिका राजळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, महिला आघाडी अध्यक्ष आशा गरड, नितीन काकडे, तुषार वैद्य, शिवसेनेचे तालुकाप्रमुख आशुतोष डहाळे, बापूसाहेब भोसले आदी उपस्थित होते.

खासदार विखे म्हणाले की, भाषणाने जे साध्य होत नाही ते गनिमी काव्याने मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आरोप-प्रत्यारोप करून चालणार नाही. उमेदवारी अर्ज भरा, पण ती मिळण्याआधीच फार पुढे जाऊ नका. नंतर मागे येणे कठीण होते. आमदार राजळे म्हणाल्या, की तालुक्यातील पक्ष चिवट, झुंजार व पदरमोड करणार्‍या कार्यकर्त्यांमुळे वाढला आहे. एकदिलाने काम केले तर निवडणूक सोपी होईल. बाजार समितीत आलेली परिवर्तनाची संधी दवडू नये. कचरू चोथे यांनी प्रास्ताविक केले. राजू सुरवसे यांनी सूत्रसंचालन केले. अमोल सागडे यांनी आभार मानले.

Back to top button