निवृत्तिवेतनासाठी कोण करू शकतो अर्ज? जाणून घ्या माहिती एक क्लिकवर | पुढारी

निवृत्तिवेतनासाठी कोण करू शकतो अर्ज? जाणून घ्या माहिती एक क्लिकवर

पुणे : राज्य व केंद्र शासनाच्यावतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना, विधवा निवृत्तिवेतन आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजना राबविण्यात येते. या योजनांचे पुणे जिल्ह्यात 91 हजार 531 लाभार्थी असून, या योजनांचा लाभ घेण्यासाठी कोण अर्ज करू शकतो? कुठे अर्ज करावा लागेल? हे जाणून घेऊया…

निवृत्तिवेतन योजना लाभार्थी
दारिर्द्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणार्‍या 65 व 65 वर्षांवरील व्यक्तींना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना गट (अ) मधून 400 रुपये आणि केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजनेचे 200 रुपये, असे एकूण 600 रुपये प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तिवेतन दिले जाते.

दारिद्य्ररेषेखालील कुटुंबातील व्यक्तींनाही मिळतो लाभ
योजनेमध्ये दारिर्द्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव किंवा कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 21 हजार रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे. योजनेखाली पात्र होणार्‍या कुटुंबात एक लाभार्थी असल्यास रुपये 600 प्रतिमहा, तर एका कुटुंबात एकापेक्षा अधिक लाभार्थी असल्यास 900 रुपये प्रतिमहा इतके आर्थिक साह्य दिले जाते.

संजय गांधी निराधार अनुदान योजना
65 वर्षांखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील
सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यांसारख्या आजारांमुळे स्वत:चा
चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा (आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या विधवांसह), घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या; परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, तृतीयपंथी, देवदासी,
35 वर्षांवरील अविवाहित स्त्री, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या पत्नी, सिकलसेल ग्रस्त या सर्वांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून प्रतिमहा 600 रुपये मानधन दिले जाते.

कोण करू शकतो अर्ज..?
वार्षिक उत्पन्न 21 हजार रुपयांच्या आत असणार्‍या कुटुंबातील वृद्धांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेतून 600 रुपये प्रतिमहा दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागेल.
पुणे जिल्ह्यात किती आहेत लाभार्थी?
संजय गांधी निराधार अनुदान योजना : 48689
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन : 32331
इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तिवेतन : 10511

Back to top button