Sri Lanka in Trouble : श्रीलंकेचे ‘मिशन वर्ल्डकप’ धोक्यात! किवींविरुद्ध सामना रद्द झाल्याने फटका | पुढारी

Sri Lanka in Trouble : श्रीलंकेचे ‘मिशन वर्ल्डकप’ धोक्यात! किवींविरुद्ध सामना रद्द झाल्याने फटका

पुढारी ऑनलाईन डेस्क : sri lanka in trouble : न्यूझीलंड विरुद्धची दुसरी वनडे रद्द झाल्याने श्रीलंका संघाचे मिशन वर्ल्डकप धोक्यात आले आहे. आशिया कप चॅम्पियन असलेला हा संघ आता अगामी आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी थेट पात्र होईल की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडने 198 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला होता. तर मंगळवारी मालिकेतील दुसरा सामना ख्राइस्टचर्च येथे खेळवला जाणार होता. पण याठिकाणी एवढा पाऊस पडला की एकही चेंडू टाकणे दूर साधा टॉसही होऊ शकला नाही. अखेर पावसाने प्रभावित झालेला हा सामना पंचांनी रद्द करण्यचा निर्णय घेतला. यानंतर वर्ल्ड कप सुपर लीगमध्ये श्रीलंका आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना समान गुण देण्यात आले. या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना आता 31 मार्च रोजी हॅमिल्टन येथे होणार आहे.

2023 मध्ये भारतात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी सात संघ थेट पात्र ठरले आहेत. यात भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. त्याचवेळी आठव्या स्थानासाठी श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात लढत आहे. या शर्यतीत अव्वल स्थानावर राहण्यासाठी श्रीलंकेला न्यूझीलंडविरुद्ध क्लीन स्वीपची गरज होती. मात्र, पहिला सामना गमावल्यानंतर हे शक्य झाले नाही. लंकन संघाने 2 सामने जिंकले असते तरीही त्यांना संधी होती. मात्र हा सामना रद्द झाल्यानंतर त्यांच्या वर्ल्डकप मोहिमेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

श्रीलंका सध्या 82 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. शुक्रवारी तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेने न्यूझीलंडचा पराभव केल्यास ते वेस्ट इंडिजला (88) मागे टाकतील आणि 92 गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानावर जातील. दरम्यान, द. आफ्रिका संघ या आठवड्यात नेदरलँड्सविरुद्ध दोन वनडे खेळणार आहे. यातील एकाच सामन्यात आफ्रिकन संघाने विजय मिळवाला यासाठी श्रीलंकेला प्रार्थना करावी लागणार आहे. सध्या द. आफ्रिकेचा संघ (78) गुणतालिकेत 10 व्या स्थानावर आहे. जर त्यांनी नेदरलँड्सविरुद्धचे दोन्ही सामने जिंकल्यास ते थेट विश्वचषकासाठी पात्र ठरू शकतात. दुसरीकडे, आयर्लंडचे 3 सामने बाकी आहेत. जर त्यांनी हे तिन्ही सामने जिंकले तर वर्ल्डकप खेळण्याचा त्यांचा मार्ग आरामात सुकर होणार आहे.

Back to top button