मोठी बातमी : EPFO व्‍याजदरात वाढ, जाणून घ्‍या नवीन व्‍याजदर | पुढारी

मोठी बातमी : EPFO व्‍याजदरात वाढ, जाणून घ्‍या नवीन व्‍याजदर

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : आर्थिक वर्ष 2022-23 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर 8.15 टक्के इतका व्याजदर निर्धारित करण्यात आला आहे. ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या आज ( दि. २८) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आर्थिक वर्ष 2021-22 साठी 8.1 टक्के इतका व्याजदर देण्यात आला होता. 1977-78 नंतरचा हा सर्वात कमी व्याजदर होता. नवीन व्‍याजदर हा आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी असेल. तीन वर्षांनंतर ईपीएफ व्‍याजदरात वाढ झाली असून ६ कोटींहून अधिक सदस्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या सोमवारी झालेल्या बैठकीत केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी सहभाग घेतला होता. कर्मचारी पेन्शन योजना 1955 अंतर्गत पेन्शनर्सना वाढीव पेन्शन देण्याच्या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा झाली होती.

ईपीएफओच्या व्याजदरावर केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे शिक्कामोर्तब झाल्यानंतर व्याजाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या ईपीएफओ खात्यात वर्ग केली जाईल. मागील काही वर्षांमध्ये ईपीएफओच्या व्याजदरात सातत्याने घसरण झालेली आहे. वर्ष 2018-19 मध्ये देण्यात आलेला 8.65 टक्क्यांचा व्याजदर 2019-20 साली साडेआठ टक्क्यांपर्यंत खाली आला होता. ईपीएफओचे देशभरात एकूण 6.78 कोटी सदस्य आहेत.

कर्मचारी भविष्‍यनिर्वाह निधीवर ( ईपीएफ ) यंदाच्‍या आर्थिक वर्षात किती व्‍याज मिळणार याकडे कर्मचारी भविष्‍य निर्वाह निधी संघटनेच्‍या ( ईपीएफओ ) सुमारे ६ कोटी सक्रिय सदस्‍यांचे लक्ष लागले होते. कारण सध्या हा व्याजदर ८.१ टक्के होता. नवीन व्‍याजदर ८.१५ हा आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी असेल.

‘ईपीएफओ’ने २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी ८.१ टक्‍के व्‍याजदर निश्‍चित केला होता. तो मागील चार दशकांमधील सर्वात निच्‍चांकी व्‍याजदर ठरला होता. १९७७-७८मध्‍ये ईपीएफवरील व्‍याजदर ८ टक्‍के होता. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये पहिल्यांदा ईपीएफमध्ये जास्त गुंतवणूक करमर्यादेत येत असल्याने आजची बैठक ही महत्त्वपूर्ण मानली जात होती.

हेही वाचा : 

Back to top button