मुंढवा : जुन्या कालव्याला पूर, पाण्याचा नव्हे राडारोड्याचा! | पुढारी

मुंढवा : जुन्या कालव्याला पूर, पाण्याचा नव्हे राडारोड्याचा!

मुंढवा; पुढारी वृत्तसेवा : एम्प्रेस गार्डन ते साडेसतरानळीपर्यंत जुन्या कालव्यात मोठ्या प्रमाणात बांधकामांचा राडारोडा व कचरा टाकला जात आहे. तसेच अनेक ठिकाणी सांडपाणीदेखील सोडले जात आहे. यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, याकडे महापालिका व पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे. बी. टी. कवडे रोडपासून पुढे शिंदे वस्तीपर्यंत जुन्या कालव्याच्या भरावावर राडारोडा टाकला जात आहे. तसेच कचराही ठिकठिकाणी साचल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे या भागात डुकरे व कुत्र्यांच्या वावर वाढला आहे.

काही व्यावसायिकांसाठी डुक्कर संगोपनासाठी ही हक्काची जागा झाली आहे. कालव्यातील कचर्‍यामुळे साथीचे आजार फैलावण्याची शक्यता परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली. याविषयी महापालिका अधिकार्‍यांकडे विचारणा केली असता कालव्यामध्ये राडारोडा टाकणार्‍यांवर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कालव्याचा इतिहास…
1874 मध्ये तात्कालीन ब्रिटिश सरकारने शेतजमिनी बागायती करण्यासाठी खडकवासला ते पाटसदरम्यान सुमारे 110 किलोमीटर लांबीच्या कालव्याची निर्मिती केली. स्वातंत्र्यानंतरच्या काळात 1965 मध्ये शासनाने सिंचन वाढविण्यासाठी खडकवासला ते इंदापूर या 210 किलोमीटर लांबीच्या नवीन कालव्याची निर्मिती केली. त्यानंतर जुन्या कालव्यात पाण्याचा विसर्ग सोडणे कमी झाले व आता हा कालवा निरुपयोगी झाला असून, तो कचराकुंडी बनला आहे.

या उपाययोजना आवश्यक…
कालव्यात सांडपाणी सोडणार्‍यांवर कारवाई करावी.
राडारोडा टाकणार्‍यांवर पोलिसांत गुन्हे दाखल करावेत
कचरा टाकला जाऊ नये प्रशासनाने सातत्याने लक्ष द्यावे
परिसरात डुक्करे सोडणार्‍यांवर कारवाई करावी

Back to top button