पुणे : कोरड्या जलतरण तलावावर पाण्यासारखा पैसा खर्च | पुढारी

पुणे : कोरड्या जलतरण तलावावर पाण्यासारखा पैसा खर्च

हिरा सरवदे

पुणे : जवळपास एक कोटी रुपये खर्च करून 2009 साली बांधलेला सावित्रीबाई पवार जलतरण तलाव राजकीय गटबाजी आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा यामुळे गेली तेरा वर्षे वापराविनाच पडून आहे. मात्र, या तलावाच्या दुरुस्तीसाठी वारंवार लाखो रुपये खर्च केले जात आहेत. आताही तलावाच्या दुरुस्तीचे काम केले आहे. मात्र, तलावाचा प्रत्यक्ष वापर केव्हा सुरू होणार, याबाबत मात्र कोणीही ठामपणे सांगत नाही.

शहरातील नागरिकांसाठी महापालिकेने विविध भागात 37 जलतरण तलाव बांधले आहेत. यामध्ये पु. ल. देशपांडे उद्यानाच्या परिसरातील सावित्रीबाई गणपत पवार या जलतरण तलावाचाही समावेश आहे. या तलावाचे काम 2008 साली सुरू झाले आणि 2009 मध्ये पूर्ण झाले. त्यासाठी 70 लाख आणि वेगवेगळ्या मशिनरी व मोटारींसाठी 30 लाख रुपये असा एक कोटीच्या आसपास खर्च करण्यात आला. या तलावाचे काम आणि पु. ल. देशपांडे उद्यानातील मोगल गार्डनचे काम एकाच वेळी पूर्ण झाले. मोगल गार्डन नागरिकांसाठी खुले झाले. मात्र, तलाव आजपर्यंत सुरू होऊ शकलेला नाही.

जलतरण तलावाच्या बाजूला पडलेला राडारोडा.

जलतरण तलावाचे काम पूर्ण झाल्यानंतर तो सुरू होण्यापूर्वीच परिसरातील भुरट्या चोरांकडून साहित्याची चोरी केली जाते. तलावाच्या स्टाईल्स, फरशा, लाईट, वायरिंग चोरीला जातात. बांधल्यापासून गेल्या तेरा-चौदा वर्षात एकदाही वापर न झालेल्या या तलावाच्या दुरुस्तीसाठी आतापर्यंत वारंवार लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. मशिन तीन वेळा बदलाव्या लागल्या आहेत.

या तलावाच्या दुरुस्तीसाठी 2022 च्या अंदाजपत्रकात 50 लाखाची तरतूद करण्यात आली होती. त्यावेळी तलावातील स्टाईल्स, फरश्या, दिवे अशी कामे केली गेली. त्यानंतरही तलाव सुरू झाला नाही. तलाव बंद असल्याने चोरीच्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाने प्रवेशद्वारावर पत्रे मारले आहेत. आता पुन्हा एकदा 12 लाखाची दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. मात्र, जलतरण तलाव केव्हा नागरिकांसाठी खुला होईल, हे कोणीही अधिकारी ठामपणे सांगण्यास तयार नाही.

दुरवस्था कायमचीच
जलतरण तलावाच्या दुरुस्तीसाठी आतापर्यंत लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. तलावाची सर्व कामे झाली असून, लवकरच तलाव खुला होईल, असे अधिकार्‍यांकडून सांगितले जात आहे. मात्र, खर्च करूनही तलावाच्या परिसराची दुरवस्था कायम आहे. तलावात पाणी भरण्यात आले आहे. मात्र, तलावाच्या भिंतीला लागून दुर्गधीयुक्त हिरवेगार पाणी साचून आहे. त्यातच परिसरात भंगार साहित्य पडून आहे.

हा जलतरण तलाव सुरू करण्यासाठी आम्ही वारंवार प्रयत्न केले आहेत. मात्र, अधिकार्‍यांच्या उदासीनतेमुळे तलाव बांधल्यापासून आजपर्यंत हा तलाव वापरात येऊ शकलेला नाही. आता प्रशासनाकडून तलाव सुरू करणार आहे, असे सांगितले जात आहे. तलाव सुरू करण्यास आमचा विरोध नाही. मात्र, या ठिकाणी दर्जेदार सेवासुविधा कायमस्वरूपी मिळायला हव्यात.

                                                – शंकर पवार, माजी नगरसेवक

Back to top button