नगर : राहुल गांधींकडून देशाची बदनामी : केेंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड | पुढारी

नगर : राहुल गांधींकडून देशाची बदनामी : केेंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

नगर; पुढारी वृत्तसेवा : भारताची लोकशाही जगात पहिल्या क्रमांकाची आहे. परंतु, राहुल गांधी यांनी इंग्लडमध्ये जाऊन भारतात लोकशाही नाही, असे म्हणून देशाची बदनामी केली. त्यावर माफी देखील मागितली नाही. परिणामी त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली, असे मत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केले.

डॉ. कराड रविवारी नगर दौर्‍यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कराड म्हणाले, राहुल गांधी यांच्या वक्तव्याबद्दल न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार संसद सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे की आमदार, खासदार दोषी आढळल्यानंतर त्यांना पदावर राहता येत नाही. या निर्णयाविरोधात तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अध्यादेश आणला होता. त्यावेळी राहुल गांधी यांनी विरोध दर्शविला होता. राहुल गांधी यांच्यावर नियमानुसार कारवाई झाली आहे.

ते म्हणाले, केंद्राचा यंदाचा 45 लाख 3 हजार 270 कोटींचा अर्थसंकल्प आहे. 2016 मध्ये 16 लाख कोटींचा अर्थसंकल्प होता. गेल्या नऊ वर्षांत काही पटीत वाढ झाली. यामध्ये संरक्षण, ट्रान्सपोर्ट, रेल्वे यासह विविध घटकांसाठी मोठी तरतूद केलेली आहे. प्रत्येक राज्यासाठी 1 लाख 50 हजार कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.

राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येऊन देशभक्त वीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. तेही चुकीचे आहे. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर झाले. नगरच्या नामांतराची मागणी आहे. परंतु, नामांतराचा महापालिकेत ठराव होऊन तो राज्य शासनाकडे जाणे आवश्यक आहे. राज्याकडून तो केंद्राकडे जाणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

48 व 200 जागा जिंकण्याचे टार्गेट
महाराष्ट्रात भाजप लोकसभेच्या 48 तर, विधानसभेच्या 200 जागा जिंकणार आहे. त्यात भाजप, शिवसेना(शिंदे गट) व रिपाइं अशी आघाडी असेल. वरिष्ठ स्तरावरून जागा वाटपाचा निर्णय होईल. युतीने गतवेळी 43 जागा जिंकल्या होत्या. आता सर्वच जागा जिंकण्याचे उद्दिष्ट आहे, असेही मंत्री कराड म्हणाले.

शेतकर्‍यांना भरीव निधी
अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामे झाल्यानंतर तत्काळ शेतकर्‍यांना मदत देण्यात येणार आहे. ही मदत केंद्र व राज्य सरकारकडून देण्यात येईल, असेही ते म्हणाले

Back to top button