पुणे : पोलिसांच्या ताब्यातील गाडी घेऊन चोरट्यांची धूम | पुढारी

पुणे : पोलिसांच्या ताब्यातील गाडी घेऊन चोरट्यांची धूम

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  मोक्काच्या गुन्ह्यात येरवडा पोलिसांनी जप्त केलेली चार चाकी गाडी (इर्टिगा) चोरीस गेल्याप्रकरणी मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी पोलिस आयुक्तांना संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करून न्यायालयाला एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

याबाबत तक्रारदाराचे वकील सोमनाथ भिसे यांनी सांगितले, की मोक्काच्या गुन्ह्यात तक्रारदार कृष्णा सुरेंद्र सिंग यांची गाडी जप्त केली होती. ती त्यांनी परत मिळण्यासाठी विशेष न्यायालयाकडे अर्ज केला होता. त्यावर न्यायालयाने तक्रारदाराला त्यांची कार परत करण्याचे आदेश दिले होते. संबंधित न्यायालयाचा आदेश घेऊन सिंग हे येरवडा पोलिस ठाण्यात गेले होते. त्या वेळी येरवडा पोलिस त्यांच्या ताब्यात असलेली गाडीची चावी सोबत घेऊन गाडी लावलेल्या वाहतूक विभागाच्या कार्यालयाच्या ठिकाणी शोधायला गेले. त्या वेळी गाडी तेथे आढळून आली नाही.

दरम्यान, सिंग यांना येरवडा पोलिसांनी दुसर्‍या दिवशी येण्यास सांगितले. दरम्यान, दुसर्‍या दिवशी सांगितल्यानुसार सिंग हे गाडी शोधण्यासाठी गेले असता त्यांना त्या वेळी कोणीही भेटले नाही. दरम्यान, सिंग यांच्या वतीने अ‍ॅड. भिसे यांनी पुन्हा कोर्टात अर्ज करून न्यायालयाने आदेश देऊनही पोलिसांनी गाडी परत केली नाही. या अर्जावर न्यायालयाने म्हणणे मागवले. त्यावर पोलिसांनी न्यायालयाला लेखी अहवाल सादर करून संबंधित कार ही दोन-तीन जण चोरून असतानाचे सीसीटीव्ही फुटेज मिळाल्याची माहिती दिली. हे फुटेज सप्टेंबर 2022 चे आहे, असे सांगताना याबाबत आम्ही जानेवारी 2023 मध्ये गुन्हा दाखल केल्याचे न्यायालयाला सांगितले.

कोर्टाचा आदेश असताना कार परत दिली नाही. न्यायालयाने खुलासा मागवला, परंतु पोलिसांनी लवकर खुलासा दिला नाही. कोर्टाने कारणे दाखवा नोटीस काढल्यानंतर न्यायालयात वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या सहीने खुलासा दाखल केला. परंतु, न्यायालयाने तो माघारी पाठवत तो सहायक पोलिस आयुक्तांच्या सहीने आणा, असे तोंडी आदेश दिले. त्यानंतर न्यायालयाने पोलिस आयुक्तांना संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. – अ‍ॅड. सोमनाथ भिसे, तक्रारदार आरोपीचे वकील

Back to top button