लटकलेली शिवसेना पाहून दु:ख होतय : राज ठाकरे | पुढारी

लटकलेली शिवसेना पाहून दु:ख होतय : राज ठाकरे

मुंबई; पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या दोन-अडीच वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणाची स्थिती पाहत आहे. राजकारणाचा झालेला बट्ट्याबोळ पाहतोय. ज्यावेळेस शिवसेना तुझी की माझी? धनुष्यबाण तुझा की माझा? हे सुरु होतं, तेव्हा वेदना होतात, अशी लटकलेली शिवसेना पाहून दु:ख होतय म्हणत शिवसेनेच्या आणि महाराष्ट्रात सुरु असेलेल्या राजकारणाचे नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाभाडे काढले. ते गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मनसेच्या पाडवा मेळाव्यात मुंबईतील शिवतिर्थ मैदानावर बोलत होते.

माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नव्हता

राज ठाकरे म्हणाले, लहाणपणापासून शिवसेना पाहत आलो, जगलो. दुसरीमध्ये असताना माझ्या खिश्यावरती तो शिवसेनेचा डरकाळी फोडणारा वाघ असायचा. मात्र, आज शिवसेनेकडे पाहताना वेदना होत आहेत. असंख्य लोकांनी कष्ट घेऊन उभी केलेली संघटना म्हणजे शिवसेना आहे. मी ज्यावेळेस त्या पक्षातून बाहेर पडलो. माझ जेव्हा भाषण झालं. तेव्हा मी म्हटलं होतं माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाही. त्याच्या भोवती असणाऱ्या बडव्यांशी आहे. ती चार टाळकी पक्ष खड्ड्यात घालणार हे माहिती होतं, त्यामुळेच मी बाहेर पडलो होतं, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री व्हायचं होतं

आज शिवतिर्थाचा कोपरान् कोपरा भरलेला दिसतोय. अनेकांनी सांगितलं हा संपलेला पक्ष आहे. जे बोलले त्यांची अवस्था काय आहे? असा सवालही राज ठाकरे यांनी ठाकरे गटाला केला. काही गोष्टी ज्या पसरवल्या गेल्या. राज ठाकरेंना शिवसेना पक्षप्रमुख पद हवे होते. किंवा पक्ष हवा होता. यामध्ये काहीही तथ्य नाही. उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख व्हायचे होते. सत्ता आली तर मुख्यमंत्री व्हायचे होते.

२०१९ मध्ये शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली. मात्र त्यानंतर काय घडले हे सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्रातील जनतेचा विचार केला पाहिजे. मतदानासाठी उन्हातान्हात रांगेमध्ये उभे राहिल्यानंतर यांचा असा खेळ पहात रहायचं? २०१९ च्या निवडणूक झाली निकाल आला आणि त्यानंतर शिवसेनेला अडीच अडीच वर्षांचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे हे वाटायला लागलं. हे कधी ठरलं होतं. उद्धव ठाकरे म्हणतात हे चार भिंतींच्या आत ठरलं होतं. मग निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी स्टेजवरुन पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार हे म्हणत होते तेव्हा तुमचं तोंड शिवलेलं का? अशी टीका राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राकडे लक्ष द्यावे

एकनाथ शिंदे यांना एवढच सांगायच आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात त्यासाठी काम करा. उद्धव ठाकरेंनी सभा घेतली की तुम्ही तिकडे सभा घ्यायची हे बंद करा. कर्मचाऱ्यांच्या पेंशनचा प्रश्न आहे? शेतकरी अवकाळी पावसामुळे चिंतेत आहे त्याकडे लक्ष द्या, असे आवाहनही राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केले.

हेही वाचंलत का?

Back to top button