Tamil Nadu | तामिळनाडूत मोठी दुर्घटना, कांचीपूरममधील फटाक्याच्या गोदामात स्फोट, ८ ठार, १६ जखमी | पुढारी

Tamil Nadu | तामिळनाडूत मोठी दुर्घटना, कांचीपूरममधील फटाक्याच्या गोदामात स्फोट, ८ ठार, १६ जखमी

कांचीपूरम : पुढारी ऑनलाईन; तामिळनाडूतील (Tamil Nadu)  कांचीपूरम जिल्ह्यातील कुरुविमलाई गावात फटाक्याच्या गोदामात झालेल्या स्फोटात ८ जण ठार झाले आहेत. तर १६ जण जखमी झाले आहेत. “घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करतील. त्यानंतर आम्हाला या घटनेबाबत अधिक माहिती मिळेल.” अशी माहिती कांचीपूरमच्या जिल्हाधिकारी एम आरती यांनी दिली आहे.

फटाक्याच्या गोदामात दुपारच्या सुमारास स्फोट झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि बचावकार्य करण्यात आले. कारखान्यातील स्फोटाचा मोठा आवाज ऐकून घाबरलेल्या रहिवाशांनी पोलिसांना यांची माहिती दिली होती. त्यानंतर तातडीने बचावपथके घटनास्थळी रवाना करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरुविमलाई गावातील फटाक्याच्या कारखान्यात २५ जण काम करत होते. हा कारखाना नरेंद्रन नावाच्या व्यक्तीचा आहे. दुपारच्या सुमारास बाहेर उन्हात सुकविण्यासाठी ठेवलेल्या फटाक्यांना आग लागली. ही आग गोदाममध्ये ठेवलेल्या फटाक्यांमध्ये पसरली. यामुळे गोदामात कामगार अडकून पडले. त्यापैकी ८ जणांचा मृत्यू झाला तर १६ जण जखमी झाले.

स्थानिकांनी अग्निशमन व बचाव विभागाला याबाबत माहिती दिली. तब्बल २५ अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे ३० मिनिटे शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. त्यांनी गोदामात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले आणि कांचीपूरमच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले.

हे ही वाचा :

Back to top button