बुलढाणा: ‘स्वाभिमानी’त धुसफूस; राजू शेट्टींना उद्देशून रविकांत तुपकर यांचे आव्हानात्मक वक्तव्य | पुढारी

बुलढाणा: 'स्वाभिमानी'त धुसफूस; राजू शेट्टींना उद्देशून रविकांत तुपकर यांचे आव्हानात्मक वक्तव्य

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा :  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला आंबा(ता.शाहूवाडी) येथे राज्यात लोकसभेच्या पाच मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटना निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली व कोअर कमिटीच्या बैठकीत मतदारसंघ व उमेदवार ठरवले जातील असेही सांगितले आहे. लोकसभेच्या पाच जागा लढविण्याची तयारी दाखवून त्यांनी संघटनेत जोश भरण्याचा प्रयत्न केला आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना क्रमाने आधी भाजप व नंतर महाविकास आघाडी अशा दोहोंशीही मतभेद झाल्याने काडीमोड घेत दूर झालेली आहे. आजघडीला यापैकी कुणाशीही सूत जुळेल अशी चिन्हेही दिसत नाहीत. शेट्टी शेतक-यांच्या प्रश्नांवर दोन्ही बाजूंवर टिकेची झोड उठवत असतात. भविष्यात लोकसभेच्या पाच जागा लढवताना कुणाच्या वळचणीला जायचे नाही, असे म्हणत शेट्टी यांनी ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. त्यांच्या हातकणंगले मतदारसंघासह पश्चिम महाराष्ट्राच्या साखर पट्ट्यातील काही लोकसभा मतदारसंघात ‘स्वाभिमानी’ ची स्वबळावर लढण्याची ताकद असू शकते. पण राज्यातील अन्य मतदारसंघात तेवढे स्वबळाचे वातावरण दिसून येत नाही.

शेट्टी यांनी लोकसभेच्या पाच जागांविषयी घोषणा केली. परंतू त्यांच्याच संघटनेचे बुलढाण्यातील एक नेते रविकांत तुपकर मात्र याविषयी पूर्णपणे अनभिज्ञ दिसावेत हे मात्र कमालीचे आश्चर्यच! रविकांत तुपकर एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, “राजू शेट्टी यांनी पाच लोकसभा मतदारसंघांची घोषणा केल्याचे मला आता तुमच्याकडून कळतंय. त्या पाच लोकसभांमध्ये बुलढाणा लोकसभेचा समावेश आहे किंवा नाही याबाबत मला काही माहिती नाही. त्यांच्या डोक्यात बुलढाणा असो किंवा नसो. पण आमच्या डोक्यात बुलढाणा लोकसभा लढण्याचं पक्क आहे आणि आम्ही पूर्ण ताकदीनं बुलढाणा लोकसभा मतदारसंघ लढवणार, असे रविकांत तुपकर म्हणाले आहेत.

रविकांत तुपकर यांच्या या वक्तव्यातून हेच ध्वनीत होत आहे की,संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या मनातील संभाव्य पाच नावांमध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा अर्थात तुपकर यांच्या नावाचा समावेश असण्याविषयी ते साशंक आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना निवडणूक लढण्यासाठी कुणा पक्षाच्या वळचणीला जाणार नाही, असा निर्धार राजू शेट्टी यांनी कालच जाहीर केला आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button