Share Market Closing | सेन्सेक्स १३९ अंकांनी वाढून ५८,२१४ वर बंद, जाणून घ्या मार्केटमधील आजच्या घडामोडी | पुढारी

Share Market Closing | सेन्सेक्स १३९ अंकांनी वाढून ५८,२१४ वर बंद, जाणून घ्या मार्केटमधील आजच्या घडामोडी

Share Market Closing : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीच्या निर्णयाकडे जगभरातील गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, जागतिक स्तरावरील बँकिंग क्षेत्रातील संकटाची तीव्रता कमी झाल्याने आज बुधवारी (दि.२२) भारतीय शेअर बाजारात तेजी राहिली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २५० वाढला होता. तर निफ्टी १७,१५० च्या वर होता. त्यानंतर दिवसभर दोन्ही निर्देशांकांची तेजी कायम राहिली. आज सेन्सेक्स १३९ अंकांच्या वाढीसह ५८,२१४ वर बंद झाला. तर निफ्टी ४४ अंकांनी वाढून १७,१५१ वर स्थिरावला. आजच्या व्यवहारात ऑटो, आयटी आणि मेटल शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर कंझ्यूमर ड्यूरेबल्स, कॅपिटल गूड आणि एनर्जी शेअर्समध्ये घसरण झाली.

IT शेअर्स वधारले

१३ प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांपैकी १२ निर्देशांक वाढले. माहिती तंत्रज्ञान (IT) शेअर्स सुमारे १ टक्के वाढले. निफ्टी ५० पैकी ३६ घटकांनी आज नफा नोंदवला. निफ्टी ५० वर एचसीएल टेक, इन्फोसिस, डिव्हिस लॅब, आयसीआयसीआय बँक आणि टेक महिंद्रा हे वाढले. तर कोल इंडिया, बीपीसीएल, सिप्ला, अपोलो हॉस्पिटल, आयटीसी, ग्रासिम, जेएसडब्ल्यू स्टील आणि डॉ. रेड्डी हे घसरले होते. आयटीमध्ये एचसीएल टेक्नॉलॉजीस (१.३७ टक्के वाढ), Coforge Ltd (१.३६ टक्के वाढ), MphasiS Ltd (१.१७ टक्के वाढ), एल अँड टी टेक्नॉलॉजी (१.०२ टक्के वाढ) हे शेअर्स वधारले होते.

‘हे’ होते टॉप गेनर्स

व्होडाफोन आयडिया (५.५६ टक्के वाढ), अदानी ग्रीन एनर्जी (५ टक्के वाढ), अदानी टोटल गॅस (४.४६ टक्के वाढ), बंधन बँक (३.७० टक्के वाढ) हे आजच्या व्यवहारात टॉप गेनर्स होते. बजाज फिनसर्व्ह ३ टक्क्यांने तर बजाज फायनान्स २.४० टक्क्यांने वाढला. एचडीएफसी लाइफ २.८२ टक्के, एसबीआय लाइफ १.८५ टक्के आणि हिंदोल्को शेअरमध्ये १.६३ टक्के वाढ दिसून आली.

संबंधित बातम्या

ऑटो स्टॉक्समध्येही तेजी

ऑटो स्टॉक्समध्ये अशोल लेलँड (२.४४ टक्के वाढ), टाटा मोटर्स (१.५७ टक्के वाढ), टीव्हीएस मोटर कंपनी (१.४८ टक्के वाढ), टाटा मोटर्स (०.७६ टक्के वाढ), महिंद्रा अँड महिंद्रा (०.६७ टक्के वाढ) हे सर्वाधिक वाढले होते. आयकर विभागाने Sobha ह्या रिअल इस्टेट डेव्हलपरच्या नोंदणीकृत कार्यालयावर आणि इतर ठिकाणी झडती घेतल्याने Sobha लिमिटेडचे ​​शेअर्स बुधवारच्या व्यवहारात ६ टक्क्यांहून अधिक घसरले. दुपारी पावणेदोनच्या सुमारास हा शेअर ६.७७ टक्क्यांनी घसरून ४८४.१० रुपयांवर आला होता.

आर्थिक स्थिरतेबद्दलची चिंता कमी झाली

अमेरिकेच्या ट्रेझरी सेक्रेटरी जेनेट येलेन यांनी सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक बंद पडल्याच्या पार्श्वभूमीवर छोट्या बँकांमधील ठेवीदारांना संरक्षण देण्याची ग्वाही दिली आहे. तसेच स्विस सरकारच्या मदतीने UBS ने आर्थिक संकटात सापडलेल्या क्रेडिट सुईस बँकेचा ताबा घेतल्याने आर्थिक स्थिरतेबद्दलची चिंता कमी झाली. परिणामी बाजारात तेजी परतली आहे. जपानचा निक्केई २२५ निर्देशांक १.९३ टक्के वाढून २७,४६६ वर बंद झाला. तर टॉपिक्स निर्देशांक १.७४ टक्के वाढून १,९६२ वर स्थिरावला. (Share Market Closing)

हे ही वाचा :

Back to top button