विम्याचे कर्ज कसे फायद्याचे? | पुढारी

विम्याचे कर्ज कसे फायद्याचे?

विमा पॉलिसीवर कर्ज घेण्यासाठी आपल्याला कोणत्याही हमीची किंवा क्रेडिट स्कोरची चिंता करण्याची गरज नाही. काही योजना वगळता कर्जासाठी पॉलिसी किमान तीन वर्षे सक्रिय असणे गरजेचे आहे.

वैयक्तिक कर्जासाठी क्रेडिट स्कोर महत्त्वाचा

पर्सनल लोन, क्रेडिट कार्डने रोख रक्कम काढायची असेल तर त्यावर 11 ते 24 टक्क्यांपर्यंत व्याज आकारले जाते. अशा प्रकारच्या कर्जमंजुरीसाठी आपल्याला चांगल्या क्रेडिट स्कोरचीदेखील गरज भासते. हे कर्ज कमी काळासाठी म्हणजे एक ते पाच वर्षांसाठी मिळू शकते. आपल्या पहिल्या कर्जाच्या आधारावर या कर्जाची मर्यादा निश्चित होते. हा पर्याय आपल्याला महागडा ठरू शकतो.

पॉलिसीचा पर्याय

जर आपल्याकडे सरकारी किंवा खासगी कंपनीची जीवन विमा पॉलिसी असेल, तर त्यावर 9 ते 10 टक्के व्याजदराने कर्ज मिळू शकते. यात आपली पॉलिसी ही हमी देण्याचे काम करते. एलआयसीच्या मनी बॅक, एंडाऊमेंट प्लॅन पॉलिसींवर कर्ज मिळते. काही यूलिप योजनांवरही कर्ज मिळते. पण टर्म इन्श्युरन्स पॉलिसीवर कर्जाचा पर्याय नाही.

किरकोळ ओझे

जर आपल्याला पॉलिसी वार्षिक सात ते आठ टक्के परतावा देत असेल, तर प्रत्यक्षात कर्जावरचे व्याज हे एक ते दोन टक्केच राहू शकते. महत्त्वाचे म्हणजे पॉलिसीच्या संपूर्ण कालावधीपर्यंत कर्जाची परतफेड करू शकता. त्याचवेळी हे कर्ज मिळवण्यासाठी आपल्याला डिफॉल्टविना सलग तीन वर्षे हप्ता भरलेला असणे गरजेचे आहे. पॉलिसीच्या कालावधीदरम्यान आपण अनेकदा कर्ज घेऊ शकतो.

कागदपत्राची झंझट नाही

पर्सनल लोनसाठी आपल्याला सॅलरी स्लिप, रहिवासी प्रमाणपत्र, पॅनकार्डसह अनेक कागदपत्रे द्यावी लागतात. त्यात समानता असणे गरजेचे असते. काहीवेळा तारण द्यावे लागते. याउलट पॉलिसीवर कर्ज घेताना एकही कागद देण्याची गरज भासत नाही.

सरेंडरपेक्षा कर्ज घेणे उत्तम

अनेकंदा गुंतवणूकदार पैशाची निकड भासल्यास पॉलिसी बंद करण्याचा निर्णय घेतात. मात्र त्याऐवजी पॉलिसीवर कर्ज घेणे उपयुक्त ठरू शकते. पॉलिसी सरेंडर करून आपण विमा कवचावर पाणी सोडतो. आतापर्यंत भरलेल्या हप्त्याच्या आणि लाभाच्या साधारणत: 80 ते 90 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळते.

नरेंद्र क्षीरसागर

Back to top button