बारामती : वीजबिल भरा, पाडवा गोड करा ; महावितरणचे आवाहन | पुढारी

बारामती : वीजबिल भरा, पाडवा गोड करा ; महावितरणचे आवाहन

बारामती ; पुढारी वृत्तसेवा : चालू आर्थिक वर्ष संपण्यास दहा दिवस शिल्लक आहेत. तर, दोन दिवसांनी गुढीपाडव्यापासून मराठी नववर्ष सुरू होत आहे. आर्थिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीने बारामती परिमंडलात वीजबिल वसुलीची मोहीम तीव्र केली असून, ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व सुट्टींच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्रेही सुरू ठेवली आहेत. वीजग्राहकांनी थकबाकीसह चालू वीजबिले भरून कारवाई टाळावी व गुढीपाडवा गोड करावा, असे आवाहन बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी केले आहे.

पुण्यातील सहा तालुके व सोलापूर, सातारा जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या महावितरण बारामती परिमंडलात 4 लाख 65 हजार 674 अकृषी वीजग्राहकांची थकबाकी तब्बल 1149 कोटींवर पोहोचली आहे. या अकृषी थकबाकीमध्ये दिवाबत्तीची सर्वाधिक 875 कोटींची थकबाकी आहे. त्याखालोखाल पाणीपुरवठा 208 कोटी, घरगुती 40 कोटी, सार्वजनिक सेवा 9 कोटी 45 लाख, तर वाणिज्यिक ग्राहकांकडे 8 कोटी 79 लाखांची थकबाकी येणे आहे. सर्वाधिक थकबाकी सोलापूर जिल्ह्यात 578 कोटी, तर सातारा जिल्ह्यात 202 कोटी आणि बारामती मंडलात ही थकबाकी 368 कोटी इतकी आहे.

थकबाकी वसुलीसाठी महावितरणने विभाग व उपविभागनिहाय पथके तयार केली आहेत. अगदी सुटीच्या दिवशीसुद्धा महावितरणचे कर्मचारी ग्राहकांपर्यंत पोहोचून थकबाकी वसुली करीत आहेत. परंतु, वसुली करताना वीज कर्मचारी व ग्राहक यांच्यात संघर्षदेखील होत आहे. हा संघर्ष टाळून ग्राहकांनी आपले वीजबिल तातडीने नजीकच्या अधिकृत वीजबिल भरणा केंद्रावर किंवा ऑनलाईन भरावे. तसेच थकबाकीमुक्तीची गुढी उभारून आपली सामाजिक प्रतिष्ठा राखावी, असे आवाहन पावडे यांनी केले आहे.

Back to top button