पुणे : जिल्ह्यात सर्वदूर अवकाळीचा फटका ; गहू, कांदा, आंबा, द्राक्ष, डाळिंब बागांचे नुकसान | पुढारी

पुणे : जिल्ह्यात सर्वदूर अवकाळीचा फटका ; गहू, कांदा, आंबा, द्राक्ष, डाळिंब बागांचे नुकसान

पुणे : पुढारी वृत्तसेवा : हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली. मुळशी तालुक्यातील काही गावांमध्ये तर गारपीट झाली. वेल्हे तालुक्यात वादळी-वार्‍यासह पाऊस झाला. आंब्याचा मोहोर, गहू, कांदा, द्राक्ष आणि डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने पुन्हा एकदा शेतकर्‍यांवर संकट कोसळले आहे. वीटभट्टीधारकांना देखील पावसाचा फटका बसला.

पानशेत, राजगड खोर्‍यासह सिंहगड परिसरात गुरुवारी (दि. 16) दुपारी 4 वाजता विजांच्या कडकडाटात जोरदार वादळी-वार्‍यासह गारपिटीचा पाऊस झाला. सायंकाळी 6 वाजेपर्यंत जवळपास 2 तास पाऊस सुरू होता. सलग दोन-तीन दिवसांपासून पडणार्‍या अवकाळी पावसाने आंब्यासह गहू, हरभरा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांचीही धांदल उडाली. काही ठिकाणी वार्‍यामुळे झाडे उन्मळून पडली.

आस्कवडी, मार्गासनी, आंबवणे, मालखेड, राजगड, मांडवी, सोनापूर, तोरणा, डोणजे, गोर्‍हे, खानापूर, सिंहगड, आंबी, वरसगाव परिसरात जोरदार वार्‍यासह गारांचा पाऊस कोसळला. मोसे बुद्रुक, साईव बुद्रुक, कुरण, रुळे, जांभली या ठिकाणी आंब्यांच्या बागा पावसाने झोडपल्या गेल्या. बागांमध्ये कैर्‍यांचे खच पडले आहेत. जागोजागी रस्त्यांवरून पाणी वाहत होते. शेतशिवारात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. काही ठिकाणी वार्‍यामुळे झाडे उन्मळून पडली आहेत.

सिंहगड, खडकवासला भागात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांची अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली. सिंहगड, तसेच पुणे-पानशेत रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. आस्कवडी येथील शेतकरी भाऊसाहेब दसवडकर यांच्या आंब्याच्या बागेतील कैर्‍यांसह कापणी करून शेतात ठेवलेला गहू, हरभरा पिकाचे नुकसान झाले.
मोसे बुद्रुक येथील दिनकर बामगुडे यांच्याही आंब्याच्या बागेचे नुकसान झाले. पावसाचे पाणी शेतात साचून भाजीपाला, रब्बी पिके बुडाली आहेत. मिरची, ढोबळी ही तरकारी पिके वाया गेली असल्याचे आंबी येथील शेतकरी संजय निवंगुणे यांनी सांगितले.

शिवगंगा खोर्‍यात पिकांचे नुकसान ; वीटभट्टी व्यावसायिकांना मोठा फटका

शिवगंगा खोर्‍यामध्ये दुपारी तीनच्या दरम्यान जोरदार वा-यांसह झालेल्या पावसामुळे आंबा, चिंच, कांदा, गहू तसेच टोमॅटो पिकाचे नुकसान झाले. वीटभट्टी व्यावसायिकांचेसुद्धा मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.
मागील दोन ते तीन दिवसांपासून शिवगंगा खोर्‍यामध्ये ढगाळ वातावरण होते. पावसाच्या भीतीने गहू काढणीला वेग आला होता. मात्र, गुरुवारी (दि. 16) झालेल्या मुसळधार पावसामुळे गहू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच आंब्याचा मोहोर पावसामुळे गळून पडला. काढणीला आलेली चिंच पावसामुळे ओली होऊन तिचे नुकसान झाले. शेतकरी दादासाहेब पवार यांनी ही माहिती दिली. शिवगंगा खोर्‍यात वीटभट्टी व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर आहेत. मार्च महिन्यात सदर व्यवसाय जोरात सुरू असतो. मात्र, अवकाळी पावसामुळे आर्थिक गणित कोलमडणार असल्याचे वीट व्यावसायिक पांडुरंग दिघे यांनी सांगितले.

राहू, बेट परिसरात वादळी-वार्‍यासह पाऊस

राहू : वादळी-वार्‍यासह राहू, बेट (दौंड) परिसरामध्ये गुरुवारी (दि. 16) अर्धा तास अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे कापणीस आलेला गहू, कांदा, हरभरा, तसेच आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मागील दोन-तीन दिवसांपासून वातावरणात उकाडा होता. बुधवारी (दि. 15) काही प्रमाणात पाऊस पडला. त्यानंतर गुरुवारी (दि. 16) देखील दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी-वार्‍यासह अर्धा तास पाऊस पडला. राहू, बेट, देवकरवाडी, वाळकी, कोरेगाव भिवर, टेळेवाडी, पिंपळगाव, नाथाचीवाडी या गावांमध्ये पाऊस झाला. तर, खुटबाव येथे झाडे उन्मळून पडली, तर अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. कैर्‍या गळून गेल्या. शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. तातडीने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Back to top button