पाकिस्तान प्रामाणिकपणा दाखवत नाही: परराष्ट्र मंत्रालयाचे वार्षिक अहवालात ताशेरे | पुढारी

पाकिस्तान प्रामाणिकपणा दाखवत नाही: परराष्ट्र मंत्रालयाचे वार्षिक अहवालात ताशेरे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील कुटुंबियांना न्याय देण्यात पाकिस्तानने आतापर्यंत प्रामाणिकपणा दाखवलेला नाही, असा ठपका परराष्ट्र मंत्रालयाने ठेवला आहे. मंत्रालयाने सोमवारी (दि.१३) जारी केलेल्या वार्षिक अहवालातून पाकिस्तानच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. २०२१-२२ च्या या व्यापक वार्षिक अहवालातून भारत, पाकिस्तान सोबत सामान्य शेजाऱ्याप्रमाणे संबंध ठेवू इच्छितो, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

भारत-पाकिस्तान दरम्यान कुठल्याही मुद्दयाला दहशतवाद तसेच हिंसाचारमुक्त वातावरणात द्विपक्षीय तसेच शांततापूर्ण पद्धतीने समाधान काढले पाहिजे, असे मत मंत्रालयाने अहवालातून व्यक्त केले आहे. पाकिस्तानी नेत्यांनी त्यांच्या अंतर्गत राजकीय तसेच आर्थिक अपयशावरून लक्ष हटवण्यासाठी त्यांच्या देशांतर्गत प्रकरणांसह भारताविरोधात द्वेषपूर्ण वक्तव्यात कुठलीही घट झाल्याचे दिसून आलेले नसल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

सीमेपलिकडील दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी पाकिस्तानला विश्वसनीय, अपरिवर्तनीय आणि सत्यापित योग्य कारवाई करणे आवश्यक आहे. पाकिस्तान सोबत सामान्य शेजाऱ्यांप्रमाणे संबंध ठेवण्याच्या भारताच्या प्रयत्नांना पाकिस्तानकडून सीमेपलिकडील दहशतवाद तसेच भारताविरोधात हिंसेच्या वारंवार समर्थनामुळे कमकुवत केले आहे. भारत दहशतवाद विरोधातील युद्धात राष्ट्रीय सुरक्षेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यासाठी दृढतेने प्रतिबद्ध आहे. भारत द्विपक्षीय, क्षेत्रीय तसेच बहुपक्षीय व्यासपीठावर पाकिस्तानकडून केला जाणारा सीमेपलिकेडील दहशतवाद, घुसघोरीला दिले जाणारे समर्थन सातत्याने मांडत आला आहे, असे देखील अहवालात नमूद करण्यात आले आहे. २६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईत दहशवादी हल्ल्यात २० सुरक्षा दलाचे कर्मचारी तसेच २६ विदेशी नागरिकांसह १६६ लोकांचा मृत्यू झाला होता. ३०० हून अधिक लोक जखमी झाले होते.

हेही वाचा 

Back to top button