सुपा रस्त्यावर वीटभट्ट्यांचे अतिक्रमण ‘जैसे थे’; ‘महसूल’ची डोळेझाक | पुढारी

सुपा रस्त्यावर वीटभट्ट्यांचे अतिक्रमण ‘जैसे थे’; ‘महसूल’ची डोळेझाक

खोर(ता. दौंड); पुढारी वृत्तसेवा : चौफुला – सुपा  रस्त्यालगत असलेल्या अनधिकृत वीटभट्टीमालकांचे कारखाने अजूनही ’जैसे थे’ आहेत. या सेवा रस्त्यावर अतिक्रमण करणार्‍या वीट भट्टीमालकांवर कारवाई करण्यास महसूल प्रशासन डोळेझाक करीत आहे.
याबाबत दै. ‘पुढारी’ ने छायाचित्रांसह बातमी प्रसिद्ध केल्यानंतर दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांनी चौफुला-सुपा सेवा रस्त्यावरील अनधिकृत वीटभट्टीधारकांवर ताबडतोब कारवाई करण्याची पावले उचलणार असल्याचे सांगितले होते. मात्र, या घटनेला एक महिना उलटूनही परिस्थिती अजूनही कायम असल्याने प्रवाशी, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.

चौफुला-सुपा हा अष्टविनायक राज्य महामार्ग असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची रहदारी असल्याने अनेक अपघात घडून अनेक प्रवासी जिवाला मुकले आहेत. हा रस्ता अष्टविनायक मार्ग असल्याने खासगी ट्रॅव्हल्स बसदेखील मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात. या रस्त्यावर साईडपट्ट्यांवर सध्या सेवा रस्ताच राहिला नसल्याचे चित्र आहे. अनेक वीटभट्टीधारकांचे कारखाने तेथे आहेत.

वीटभट्टी कारखाने राज्य महामार्गांच्या कडेलाच असल्याने प्रवाशांना धूर आणि धुळीला समोरे जावे लागत आहे. मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यावर कडेलाच सेवा रस्त्यावर व साईडपट्ट्यांवर वीट कारखाने उभारून वीटभट्टीधारकांनी अतिक्रमण केले आहे. याकडे रस्ते प्रशासन व दौंड सार्वजनिक बांधकाम विभाग उघडपणे डोळेझाक करीत आहेत.

Back to top button