दहावीचा हिंदीचा पेपर पुन्हा होणार नाही | पुढारी

दहावीचा हिंदीचा पेपर पुन्हा होणार नाही

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वेळापत्रकावर विश्वास ठेवल्याने राज्यातील अनेक विद्यार्थ्यांचा बुधवारी झालेला हिंदीचा पेपर चुकला. या विद्यार्थ्यांचा तो पेपर पुन्हा होणार नाही आणि त्या विद्यार्थ्यांना आता जुलैमध्ये होणारी पुरवणी परीक्षा द्यावी लागणार आहे. शाळांत असलेल्या राज्य मंडळाच्या छापील वेळापत्रका आधारेच परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन पुन्हा राज्य मंडळाने केले आहे.

राज्य मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, दहावीच्या हिंदी विषयाची परीक्षा ८ मार्चला होती. मात्र, सोशल मीडियावरील वेळापत्रकात हिंदीची परीक्षा ९ मार्चला असल्याचे म्हटले होते. त्यामुळे राज्यातील काही विद्यार्थी ९ मार्चला पेपर देण्यासाठी ९ परीक्षा केंद्रावर गेले. मात्र, हिंदीचा पेपर ८ मार्चला झाल्याचे समजल्यावर विद्यार्थ्यांचा प्रचंड गोंधळ उडाला. राज्य मंडळाने दिलेले छापील वेळापत्रक न पाहता सोशल मीडियावरील वेळापत्रकावर अवलंबून राहिल्याने अभ्यास करूनही वर्ष वाया गेल्याचा प्रकार घडला आहे.

एटीकेटीच्या नियमांप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेश

हा पेपर पुन्हा जुलैमध्ये होणार असला तरी अशा विद्यार्थ्यांना अकरावीत एटीकेटीच्या नियमांप्रमाणे प्रवेश घ्यावा लागणार आहे. पेपर पुन्हा होणार नसल्याचेही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही गुरुवारी विधिमंडळात माहिती दिली. सोशल मीडियावर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही दीपक केसरकर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.

संबंधित बातम्या

दररोज दोन सत्रांत आणि विविध विषयांचे पेपरचे आयोजन करण्यात येते, यामुळे त्या पेपरला नेमके किती विद्यार्थी गैरहजर राहिले, ही माहिती तत्काळ सांगता येणार नाही. सर्व विभागीय मंडळांकडून माहिती घ्यावी लागेल. या संदर्भात राज्य मंडळाकडे अद्याप एकाही पालक आणि विद्यार्थ्यांची तक्रार आलेली नाही. विद्यार्थ्यांनी शाळांत असलेल्या राज्य मंडळाच्या छापील वेळापत्रका आधारेच परीक्षेला सामोरे जावे.
– शरद गोसावी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

Back to top button