पीएमश्री योजनेत दौंडमधील 87 शाळा; शिक्षणाधिकार्‍यांची माहिती | पुढारी

पीएमश्री योजनेत दौंडमधील 87 शाळा; शिक्षणाधिकार्‍यांची माहिती

खोर(दौंड); पुढारी वृत्तसेवा : पीएम श्री योजनेच्या पहिल्या टप्प्यात देशातील 15 हजाराहून अधिक शाळा सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. यात राज्यातील 846 शाळांचा समावेश आहे. दौंड तालुक्यातील 87 शाळांची या योजनेत निवड झाली आहे. यात डोंबेवाडीतील जिल्हा परिषद शाळेचाही समावेश असल्याची माहिती दौंडचे शिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनी दिली.
या योजनेत निवड झालेल्या प्रत्येक शाळेसाठी 1 कोटी 88 लाख एवढी तरतूद 5 वर्षांसाठी करण्यात येईल. या शाळांसाठी 5 वर्षांकरिता केंद्राचा हिस्सा 955 कोटी 98 लाख राहणार आहे. राज्यांचा 40 टक्के हिस्सा प्रती शाळा 75 लाख प्रमाणे 634 कोटी 50 लाख खर्च अपेक्षित आहे.

शाळांचा विकास प्रामुख्याने पुढील 6 प्रमुख आधारस्तंभांवर केला जाईल. अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र व मूल्यमापन, प्रवेश आणि पायाभूत सुविधा, मानव संसाधन आणि शालेय नेतृत्व, समावेशक पद्धती आणि लैंगिक समाधान, व्यवस्थापन, देखरेख आणि प्रशासन, लाभार्थी समाधान या विषयांची पडताळणी करून निकष ठरविण्यात आले आहेत.

दौंड तालुक्यातील डोंबेवाडी शाळेला 144 गुणांपैकी 100 गुण प्राप्त होऊन 69.44 टक्के मार्क प्राप्त झाले आहेत. या ठिकाणी 67 विद्यार्थी संख्या असून गोरख सातपुते व मालोजी जाधव हे शिक्षक कार्यरत आहेत. ग्रामीण भागामधील शाळेला जर मपीएम श्री योजनेफच्या माध्यमातून अद्ययावत शिक्षण प्रणाली अंमलात आणली गेली, तर विद्यार्थ्यांचा भौतिक विकास होण्याबरोबरच शाळेचा सर्वांगीण विकास होणार आहे.

दौंड तालुक्यातील 87 शाळांची पीएम श्री योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. सर्व शाळा या 56 टक्क्यांमध्ये पास झाल्या आहेत. येत्या महिनाभरात या शाळांना निधी उपलब्ध होणार आहे. त्यातून शाळा विकसित केल्या जातील.

                                        – बाळकृष्ण कळमकर, शिक्षणाधिकारी, दौंड.

Back to top button