गोवा : रंग गाडीवर टाकल्‍याने युवकावर तलवार हल्‍ला; पाच जणांना अटक | पुढारी

गोवा : रंग गाडीवर टाकल्‍याने युवकावर तलवार हल्‍ला; पाच जणांना अटक

मडगाव; पुढारी वृत्तसेवा एका युवकावर तलवार आणि सुऱ्यासारख्या हत्यारांनी जीवघेणा हल्ला होण्याच्या घटनेने केपेतील होळीच्या उत्सवाला गालबोट लागले. होळीचा रंग गाडीवर घातल्याच्या रागाने मायणा कुडतरी येथील कुख्यात गुंडानी कट्टा आमोणा येथे रहाणाऱ्या प्रज्योत नाईक (तातून) या युवकाचे अपहरण करून त्याच्यावर तलवारीने हल्ला केल्याची घटना (मंगळवार) रात्री उशिरा घडली. हल्लेखोरांकडुन तलवारी आणि सुरे केपे पोलिसांनी जप्त केले असून, पाच जणांना उशीरा ताब्यात घेतले आहे.

या घटनेनंतर युवकांच्या जमावाने केपे पोलिस स्थानकावर गर्दी करून या हल्ल्यातील आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. ऐन होळीच्या दिवशी घडलेल्या या हल्ल्यामुळे केपेत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. पोलीसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पाच जणांना ताब्यात घेतले असून, मध्यरात्री पर्यत त्या पाचही जणांवर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

या विषयी सविस्तर माहिती अशी की, सकाळीं शिमग्याचा मेळ आटोपून आमोणा भागातील युवक होळी साजरी करत होते. रस्त्यावर होळीचा जल्लोष सुरु असताना किंगस्ली नामक एक युवक पांढऱ्या रंगाची मारूती स्विफ्ट कार घेऊन त्या ठिकाणी आला. रस्त्यावर युवक होळी साजरी करत असल्याचे पाहून रागाने त्याने गाडीचा वेग वाढवत एका युवकाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. पण होळीतील युवकांनी संयमाने घेत त्याला जाण्यासाठी वाट मोकळी करून दिली. दरम्यान जमावातील एकाने त्याच्या गाडीवर गुलाल फेकल्यामुळे किंगस्ली याने तुम्हाला आता दाखवतो अशी धमकी देऊन तेथून निघून गेला.

सायंकाळी होळी साजरी करुन सर्वजण अपल्या घरी परतत असताना किंगस्ली याने मायणा कुडतरी भागातील आपल्या आठ मित्रांच्या साहाय्याने प्रज्योत यांच्यावर तलवारी, चाकू आदी हत्यारांच्या साहाय्याने त्याचावर जीवघेणा हल्ला चढवला. तलवारीचा वार चुकवण्याच्या प्रयत्नात प्रज्योत याच्या हाताला गंभीर स्वरूपाची ईजा झाली आहे.

घटनास्थळी लोकांचा जमाव जमल्याचे पाहून त्यातील तिघा जणांनी तेथुन पोबारा केला, तर पाचजण पोलिसांच्या हाती लागले. हल्ल्यासाठी आणलेल्या तलवारी त्यांनी गटारात फेकून दिल्या होत्‍या. पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत.

प्रज्योत नाईक याचे अपहरण करून त्याला त्या स्विफ्ट कार मध्ये कोंबण्यात आले होते. गाडीतच त्याला बेदम मारहाण करण्यात आली. ज्या वेगनर गाडीतून हल्लेखोर आले होते. त्या गाडीच्या नंबर प्लेटवर माती लावून नोंदणी क्रमांक लपवण्यात आला होता. त्या गाडीत आणखीही हत्यारे होती. नगरसेवक दयेश नाईक यांनी पुढारीशी बोलतांना ते हल्लेखोर प्रज्योत आणि सर्वेश नामक युवकांना जीवे मारण्यासाठी आले होते. त्यांना पकडले नसते तर आज एकाचा तरी जीव त्यांनी घेतला असता, अशी भीती व्यक्त केली. हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन कारगाड्या पोलीसांनी जप्त केल्या आहेत. शास्त्रार्थ कायदा,अपहरण कायदा आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा नोंद केला जाईल अशी माहिती पोलिस निरीक्षक पेडणेकर यांनी दिली आहे.

हेही वाचा : 

Back to top button