Steve Smith : भारतासाठी धोक्याची घंटा, चौथ्या कसोटीत ‘हा’ असेल ऑस्ट्रेलियाचा कर्णधार! | पुढारी

Steve Smith : भारतासाठी धोक्याची घंटा, चौथ्या कसोटीत ‘हा’ असेल ऑस्ट्रेलियाचा कर्णधार!

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs AUS 4th Test : स्टीव्ह स्मिथच्या (Steve Smith) नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने तिसऱ्या कसोटीत भारताचा 9 गडी राखून पराभव केला. स्मिथला फलंदाजीत कमाल दाखवता आली नसली तरी संघाचे उत्कृष्ट नेतृत्व करत त्याने सर्वांना प्रभावित केले. तिसऱ्या कसोटीतील विजयासह ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना 9 मार्चपासून अहमदाबादच्या स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आता सामन्यापूर्वीच एक मोठे अपडेट समोर आली आहे.

पॅट कमिन्स दुसऱ्या कसोटीनंतर तो आपल्या आजारी आईची काळजी घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाला परतला. तिसऱ्या कसोटीपूर्वी तो संघात पुन्हा सामील होणार होता पण या कठीण काळात त्याने कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चौथ्या कसोटीत पुन्हा एकदा स्टीव्ह स्मिथ कर्णधारपद सांभाळाताना दिसणार आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने या बाबत वृत्त दिले आहे.

ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी सांगितले की, पॅट कमिन्स सध्या ऑस्ट्रेलियातच आहे. या कठीण काळात आम्ही सर्व त्याच्यासोबत असून त्याच्याशी दैनंदिन संपर्कात असतो. चौथा कसोटी सामना काही दिवसांवर येऊन ठेपला आहे, त्यामुळे आम्ही दररोज त्याच्याशी चर्चा करतो. (IND vs AUS 4th Test)

भारताविरुद्ध सर्वोत्तम कर्णधारपदाचा विक्रम

गेल्या दशकात स्टीव्ह स्मिथ हा एकमेव परदेशी कर्णधार आहे ज्याने भारतात दोन कसोटी सामने जिंकले आहेत. त्याच्याच नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 2017 मध्ये पुण्यात भारताचा 333 धावांनी पराभव केला होता. त्याचबरोबर इंदूर कसोटीतही त्याने उत्तम कर्णधारपदाची कामगिरी केली आहे. तो भारताविरुद्ध वेगळी रणनीती अवलंबतो. स्मिथने चौथ्या कसोटीत कर्णधारपद भूषवले तर ती टीम इंडियासाठी धोक्याची घंट असेल, असे अनेकांचे म्हणणे आहे.

कर्णधार म्हणून स्मिथची आकडेवारी (steve smith captain)

बॉल टॅम्परिंग प्रकरणात सापडण्यापूर्वी स्मिथने 2014 ते 2018 दरम्यान 34 कसोटी सामन्यांमध्ये संघाचे कर्णधारपद भूषवले होते. तर बॉल टॅम्परिंगनंतर त्याने 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध प्रथमच संघाचे नेतृत्व केले. तो सामना ऑस्ट्रेलियाने 275 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला होता. यानंतर 2022 मध्ये अॅडलेड कसोटीत कांगारूंनी स्मिथच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजचा 419 धावांनी पराभव केला होता.

कसोटी कर्णधार म्हणून स्मिथची आकडेवारी आश्वासक आहे. एकूण 36 सामन्यांपैकी संघाने 20 जिंकले असून 10 सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागला आहे. तर 6 सामने अनिर्णित राहिले आहेत. स्मिथने भारताविरुद्ध 8 सामन्यात कर्णधारपद भूषवले आहे. यापैकी 3 सामन्यात विजय मिळवला असून 2 गमावले आहेत. तर 3 सामने अनिर्णित राहिले आहेत.

ऑस्ट्रेलियाने शेवटचा भारत दौरा 2017 मध्ये केला होता. तेव्हा स्मिथ कर्णधार होता. त्या दौऱ्यात स्मिथने तीन शतके झळकावली होती. मात्र त्या मालिकेत कांगारूंचा 2-1 पराभव झाला झाला होता. परंतु ऑस्ट्रेलियाने पहिला सामना 333 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला होता. पुण्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात स्मिथने शतक झळकावले. स्मिथने या मालिकेत सर्वाधिक 499 धावा केल्या, पण तो संघाला मालिका विजय मिळवून देऊ शकला नव्हता. यंदाचा भारत दौरा स्मिथसाठी निराशाजनक ठरला आहे. त्याने आतापर्यंत चार डावांत 23.66 च्या सरासरीने 71 धावा केल्या आहेत.

काय होते बॉल टॅम्परिंग प्रकरण (steve smith captain record)

2018 मध्ये ऑस्ट्रेलियन संघ द. आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. केपटाऊनमधील तिसऱ्या कसोटीत कॅमेरून बॅनक्रॉफ्ट चेंडूसोबत काहीतरी करताना दिसला. नंतर त्याच्या हातात सँड पेपर असून तो बॉल घासत असल्याचे दिसून आले. यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथने याबाबत कबुली दिली. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तत्कालीन कर्णधार स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर 12-12 महिन्यांची बंदी तर बॅनक्रॉफ्टवर 9 महिन्यांची बंदी घातली. या प्रकरणातच स्मिथने कर्णधारपद गमावले होते. (IND vs AUS 4th Test)

कर्णधार म्हणून स्मिथचे फलंदाजी रेकॉर्ड (steve smith batting record)

स्मिथने 36 सामन्यांत 67.73 च्या प्रभावी सरासरीने 3,793 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 15 शतके आणि 14 अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 239 आहे. या कालावधीत त्याने 407 चौकार आणि 16 षटकार मारले आहेत. त्याने 6,744 चेंडूंचा सामना केला असून दोनदा खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. संघाचा कर्णधार नसताना त्याने 58 कसोटीत 55.33 च्या सरासरीने 4,925 धावा केल्या आहेत.

भारताविरुद्ध स्मिथची कामगिरी

टीम इंडियाविरुद्ध स्मिथने 2013 ते 2023 या कालावधीत 16 कसोटी सामन्यांमध्ये 67.14 च्या सरासरीने 1,813 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 8 शतके आणि 5 अर्धशतके फटकावली आहेत. कर्णधार असताना यात 7 शतके आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचा स्ट्राइक रेट 54.24 आहे. स्मिथने भारताविरुद्ध 195 चौकार आणि 10 षटकार मारले असून तो 5 वेळा नाबाद राहिला आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 192 आहे.

स्मिथची कसोटी कारकीर्द कशी राहिली?

स्मिथ कसोटीत सातत्यपूर्ण धावा करणारा खेळाडू आहे. एका दशकाहून अधिक कालावधीच्या त्याच्या कसोटी कारकिर्दीत त्याने 94 कसोटींमध्ये 60.12 च्या सरासरीने 8,718 धावा केल्या. दरम्यान, त्याच्या खात्यात 30 शतके आणि 37 अर्धशतके जमा झाली आहेत. सध्याच्या भारत दौऱ्यात स्मिथला आतापर्यंत एकही मोठी खेळी खेळता आलेली नाही. त्याने यापूर्वी नागपुरात 37 आणि 25* धावा केल्या होत्या. यानंतर दुसऱ्या कसोटीत त्याची तो 0 आणि 9 धावा करून माघारी परतला होता.

Back to top button