नगर : प्रलंबित प्रश्नांकडे वेधले लक्ष ; आमदार राजळेंकडून अधिवेशनात मतदारसंघाच्या विविध मागण्या | पुढारी

नगर : प्रलंबित प्रश्नांकडे वेधले लक्ष ; आमदार राजळेंकडून अधिवेशनात मतदारसंघाच्या विविध मागण्या

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  आमदार मोनिका राजळे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले. अतिवृष्टी अनुदान, पीक विमा, बाह्यवळण रस्ता, दोन्ही तालुक्यांत पोलिस ठाणे, पोलिस वसाहत, न्यायालय इमारतीसह मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय आदी पुरवणी मागण्या, तसेच ऊस तोडणी व धनगर समाजाच्या उन्नतीसाठी विविध योजना राबवून निधी उपलब्ध करण्याची मागणी आमदार राजळे यांनी केली.

राजळे म्हणाल्या, बोधेगाव व खरवंडी कासार येथे नव्याने स्वतंत्र पोलिस ठाणे मंजूर करावेत, तसेच शेवगाव व पाथर्डी येथे पोलिस वसाहतीला मंजुरी द्यावी, शेवगाव पोलिस ठाण्याच्या प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव पाठवला असून, महसूल विभागाकडून जागा हस्तांतर होऊन प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली.

शेवगाव व पाथर्डी तालुक्यात चार साखर कारखाने असल्याने ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांची वर्दळ असते. यामुळे शेवगाव व पाथर्डी तालुक्यांत वाहतूक कोंडी होते. दोन्ही शहरांना बाह्यवळण रस्ता व्हावा, तसेच तिसगाव ते पैठण व नेवासा ते गेवराई या राज्यमार्गाचे काम होणे गरजेचे असून, या कामाला मंजुरी मिळावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. शेवगाव नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीचा प्रश्न कायम आहे, तसेच पाथर्डी व शेवगाव येथे विविध विभागाची सेवा एका छताखाली येण्यासाठी मध्यवर्ती इमारतीसाठी निधी मिळावा, तसेच पाथर्डी येथील न्यायालय इमारतीची जागाही अपुरी असल्यामुळे इमारतीसाठी निधी मंजूर व्हावा, असाही आग्रह त्यांनी धरला.

सौर कृषिपंप योजना राबवा
देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री असताना सरकारने सौभाग्य योजना राबविली होती. ही योजना आघाडी सरकारने बंद केली. ती पुन्हा सुरू करावी. शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा व्हावा, ही सर्वसमावेशक मागणी आहे, त्याचबरोबर मागेल त्याला शेततळे या योजनेप्रमाणे मागील त्याला सौर कृषिपंप योजना राबवावी, अशी मागणी आमदार राजळे यांनी केली.

Back to top button