गडचिरोली : नक्षलवाद्यांकडून ३ वाहनांची जाळपोळ; परिसरात भीतीचे वातावरण | पुढारी

गडचिरोली : नक्षलवाद्यांकडून ३ वाहनांची जाळपोळ; परिसरात भीतीचे वातावरण

गडचिरोली ; पुढारी वृत्‍तसेवा सशस्त्र नक्षल्यांनी काल (गुरुवार) रात्री एटापल्ली तालुक्यातील गट्टा-जांभिया पोलिस मदत केंद्रांतर्गत पुरसलगोंदी-अलेंगा मार्गावर सुरु असलेल्या पूल बांधकामावरील ३ वाहनांची जाळपोळ केली. यामुळे परिसरात भीती निर्माण झाली आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, पुरसलगोंदी-अलेंगा मार्गावरील नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. गुरूवार रात्री ८ वाजण्याच्या सुमारास २० ते २५ सशस्त्र नक्षलवादी बांधकामस्थळी गेले. त्यांनी पोकलेन, जेसीबी व मिक्सर मशिनला आग लावली. तीन दिवसांपूर्वीच भामरागड तालुक्यातील बोटनफुंडी-विसामुंडी मार्गावर रस्ता आणि पाईप कलवर्टच्या कामावरील मिक्सर मशीन जाळली होती. त्यानंतरची ही दुसरी घटना आहे.

पुरसलगोंदी परिसरात असलेल्या सुरजागड पहाडावर मागील दोन वर्षांपासून लॉयड मेटल्स आणि त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीतर्फे लोहखनिज उत्खनन करण्यात येत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून या भागात नक्षल्यांच्या हालचाली सुरू असून, ते बैठका घेऊन मजुरांना सुरजागडच्या कामावर न जाण्याची तंबी देत आहेत. अशातच त्यांनी काल पूल बांधकामावरील वाहनांची जाळपोळ केली. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

हेही वाचा : 

Back to top button