मोठी बातमी! अंगणवाडी सेविकांची २० टक्के पगारवाढ होणार | पुढारी

मोठी बातमी! अंगणवाडी सेविकांची २० टक्के पगारवाढ होणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अंगणवाडी सेविकांची २० टक्के पगारवाढ होणार आहे. याबाबत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी माहिती दिली आहे. अंगणवाडी सेविका मानधन वाढ अर्थसंकल्प अधिवेशनात होईल. वीस टक्के पगार वाढ केली जाणार असून मे महिन्यापर्यंत २० हजार अंगणवाडी सेविकांची भरती करणार असल्याचे त्यांनी नमूद कले.

राज्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले आहे. मुंबईतील आझाद मैदावर आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या होत्या. आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मैदान सोडणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. राज्य सरकारकडून साडेपाच तर केंद्राकडून गेली साडेचार वर्षात मानधनात वाढ झालेली नाही. त्याचबरोबर इतर मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका यांनी कामबंद आंदोलन केले होते.

दरम्यान, अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावरून विधानसभेत गदारोळ निर्माण झाला. विधानसभेचे कामकाज सुरु असताना अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक झाले. विरोधकांनी सभात्याग करत विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांवरून विरोधक आक्रमक झाले आहेत.

दरम्यान, विधीमंडळ सभागृहातील शंभर आमदार अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मानधन वाढवून देण्याबाबत प्रश्न विचारत आहेत इतका गंभीर प्रश्न असताना संबंधित बालविकासमंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगणार आहेत, असे बोलत असतील तर या मंत्र्यांना इथे उत्तर देण्याचा काय अधिकार आहे, असा थेट सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.

अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधन वाढीचा प्रश्न सभागृहात आमदार पोटतिडकीने विचारात असताना बालविकास मंत्री समाधानकारक उत्तर देत नसल्याने विरोधी आमदार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यातील अंगणवाडी सेविकांना १५ हजार रुपये मानधन आणि मदतनीसांना १० हजार रुपये मानधन देणार का? असा सवालही अजित पवार यांनी मंत्र्यांना केला. दरम्यान अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या प्रश्नावर योग्य ते व समाधानकारक उत्तर बालविकास मंत्री लोढा यांनी न दिल्याने विरोधकांनी सभात्याग केला.

 

Back to top button