Rohit Sharma Support Rahul : केएल राहुलला आणखी एक मौका.. मौका! कॅप्टन रोहितने दिले संकेत | पुढारी

Rohit Sharma Support Rahul : केएल राहुलला आणखी एक मौका.. मौका! कॅप्टन रोहितने दिले संकेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : जर राहुलला उपकर्णधारपदावरून वगळण्यात आले असेल तरी हा इतर कोणत्याही शक्यतेचा संकेत असू शकत नाही. संघ व्यवस्थापन खेळाडूंच्या नेहमी पाठीशी राहील, असे म्हणत भारतीय कर्णधार रोहित शर्माने राहुल विरुद्ध शुभमन गिल वादाला प्रत्युत्तर दिले. तिसरी कसोटी सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला त्याने आपले मत स्पष्ट केले.

नागपूर आणि त्यानंतर दिल्ली कसोटीत फ्लॉप झाल्यानंतर, केएल राहुलला डच्चू दिला जाऊन त्याच्या जागी शुभमन गिलला संधी दिली जाईल अशी दाट शक्यता व्यक्त केली जात होती. पण रोहितने आपल्या वक्तव्यातून त्याच्यासोबत डावाची सुरुवात कोण करणार, याचे एकप्रकारे संकेत दिल्याची चर्चा रंगली आहे. फ्लॉप होऊनही राहुलला आणखी एक संधी मिळू शकते, असा अंदाज अनेकांनी वर्तवला आहे.

पत्रकार परिषदेत रोहितला प्रथम राहुलचे उपकर्णधारपद काढून घेण्याचा अर्थ काय असा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने उत्तर दिले की, ‘हे काहीही सूचित करत नाही. संघातील सर्व 17 खेळाडूंना संधी आहे. जे प्रतिभावान आहेत त्यांना संघ नेहमीच पाठिंबा देईल. उपकर्णधारपदावरून वगळण्यात आले म्हणजे काही खळबळजनक झालेले नाही. त्याला उपकर्णधार बनवण्यात आले कारण कदाचित त्यावेळी फारसे अनुभवी खेळाडू नव्हते.’

रोहित आणि गिल यांनी मंगळवारी सराव सत्रा दरम्यान एकत्र नेटमध्ये फलंदाजी केली तर राहुलने संघातील बहुतांश सदस्यांसह हॉटेलमध्येच थांबण्याचा निर्णय घेतला. सोमवारी सराव सत्रादरम्यान गिल आणि राहुल या दोघांनी एकत्र फलंदाजी केली. 47 कसोटींनंतर राहुलची सरासरी 33.4 आहे, तर गिल मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सनसनाटी हंगामानंतर रेड बॉल क्रिकेटमध्ये संधीची वाट पाहत आहे. शेवटच्या 10 कसोटी डावांमध्ये 25 धावांचा टप्पा ओलांडण्यात अपयशी ठरलेल्या राहुलला दिल्लीतील दुसऱ्या कसोटीनंतर उपकर्णधारपदावरून वगळण्यात आले, त्यामुळे उर्वरित दोन सामन्यांमध्ये बदलाची आशा निर्माण झाली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित म्हणाला, ‘मी गेल्या सामन्यानंतरही याबद्दल बोललो होतो. कठीण काळातून जात असलेल्या खेळाडूंना त्यांची क्षमता लक्षात घेऊन स्वत:ला सिद्ध करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल. मी तुम्हाला काहीही सांगू शकत नाही. त्यावेळी तो उपकर्णधार होता. उपकर्णधार असणं किंवा नसणं, यावरून तुम्हाला काहीही संकेत मिळत नाहीत. आमच्या टॉप ऑर्डरमधील फलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केलेली नाही, पण आमचा प्रयत्न खेळात गुणवत्ता आणणे हा आहे, ज्याचे परिणाम नक्कीच अगामी कसोटीत मिळतील,’ असा विश्वास त्याने व्यक्त केला.

गिल आणि राहुल या दोघांच्या तयारीबद्दल विचारले असता, कर्णधार म्हणाला, ‘जिथपर्यंत गिल आणि राहुलचा संबंध आहे, ते कोणत्याही सामन्यापूर्वी अशा प्रकारे ट्रेनिंग करण्यास प्राधान्य देतात. आज संपूर्ण संघासाठी एक वैकल्पिक सराव सत्र होते. ज्याला यात भाग घ्यायचा होता त्याने घेतला. प्लेईंग इलेव्हन बाबतचा निर्णय टॉसदरम्यान जाहीर केला जाईल,’ असेही त्याने स्पष्ट केले.

Back to top button