पुढारी ऑनलाईन डेस्क : NZ beat ENG by 1 Run : नील वॅगनर (4 विकेट), टीम साऊदी (3), मॅट हेन्री (2) यांनी इंग्लंडच्या बेजबॉज रणनीतीला सुरुंग लावत वेलिंग्टन कसोटीत न्यूझीलंडला अवघ्या 1 रनने रोमहर्षक विजय मिळवून दिला. इंग्लंडसमोर विजयासाठी 258 धावांचे लक्ष्य होते, मात्र दुसऱ्या डावात त्यांना केवळ 256 धावाच करता आल्या. विशेष म्हणजे फॉलोऑन खेळून न्यूझीलंडने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयासह यजमान किवींनी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
कसोटी क्रिकेटचा उत्साह कधीच संपू शकत नाही. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात वेलिंग्टन येथे पार पडलेल्या कसोटीत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. वेलिंग्टन कसोटीत इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत आपला पहिला डाव 8 बाद 435 धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव 209 धावांत आटोपला. यानंतर इंग्लंडने स्वत: फलंदाजीला न उतरता यजमान किवींना फॉलोऑन दिला. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ पुन्हा एकदा फलंदाजीसाठी मैदानात उतरला. आपल्या पहिल्या डावातील चुका टाळून किवी फलंदजांनी आपल्या दुस-या डावात संयमी फलंदाजी केली. डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या टॉम लॅथम आणि डेव्हन कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी 149 धावांची भागीदारी केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना केन विल्यमसनने 132 धावांची शानदार खेळी केली. मधल्या फळीत टॉम ब्लंडेलने 91 आणि डॅरिल मिशेलने 54 धावा केल्या. अशाप्रकारे किवींनी दुसऱ्या डावात 483 धावा केल्या आणि इंग्लंडला 258 धावांचे लक्ष्य दिले.
विजयासाठी 258 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने चौथ्या दिवसाअखेर एक बाद 48 धावा केल्या होत्या. मंगळवारी सामन्याचा पाचवा आणि शेवटचा दिवस होता आणि इंग्लंडला विजयासाठी 210 धावांची गरज होती. मात्र, पाचव्या दिवशी किवी गोलंदाजांनी बाजी उलटवली. त्यांनी पहिल्या तासात इंग्लंडचे चार गडी बाद केले. टीम साऊदीने नाईट वॉचमन ऑली रॉबिन्सनला (2) ब्रेसवेलकरवी झेलबाद करून इंग्लंडला दुसरा धक्का दिला. त्यानंतर मॅट हेन्री याने बेन डकेट (33) आणि नील वॅगनरने ऑली पोप (14) यांना बाद करून इंग्लंडला बॅकफुटवर ढकलले. मालिकेतील स्टार हॅरी ब्रूक खाते न उघडता धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतल्याने इंग्लंडच्या अडचणीत आणखीनच भर पडली. इंग्लंडने 80 धावांत पाच विकेट गमावल्या होत्या.
पण त्यानंतर जो रूट (95 धावा, 8 चौकार-3 षटकार) आणि स्टोक्सने (33) यांनी टी-ब्रेकपर्यंत 168 आणि त्यानंतर 201 धावांपर्यंत मजल मारली. या जोडीच्या खेळीमुळे यजमान किवी संघ दबावाखाली आला. रुट-स्टोक्स यांनी सहाव्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी केली. वॅगनरने स्टोक्सला बाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर अवघ्या दोन धावांच्या अंतराने वॅगनरने धोकादायक रुटला सुद्धा माघारी धाडले. रुटचे शतक 5 धावांनी हुकले.
हेन्रीने इंग्लंडला आठवा धक्का दिला. त्याने स्टुअर्ट ब्रॉडला (11) वॅगनरकडे झेलबाद केले. यानंतर बेन फोक्स (35) आणि जॅक लीच (1*) यांनी 9व्या विकेटसाठी 36 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्यामुळे सामना अत्यंत रोमांचक स्थितीत पोहचला. या दोघांनी इंग्लंडला 250 धावांच्या पुढे नेले. फॉक्सला बाद करून साऊदीने इंग्लंडला 9वा झटका दिला. जेम्स अँडरसनने मैदानात उतरताच चौकार मारत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहचवले. पण 75 व्या षटकात वॅगनरने 256 धावसंख्येवर अँडरसनला यष्टिरक्षक ब्लंडेलकरवी झेलबाद करून न्यूझीलंडला रोमहर्षक विजय मिळवून दिला.
न्यूझीलंडच्या विजयाचा हिरो ठरला नील वॅगनर. त्याने 15.2 षटकांत 62 धावांत 4 विकेट घेतल्या. कर्णधार टीम साऊदीने तीन बळी घेतले. मॅट हेन्रीला त्याच्या खात्यात दोन विकेट मिळाल्या.
या रोमांचक कसोटीमध्ये अनेक धक्कादायक विक्रमांची नोंद झाली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ही दुसरी वेळ आहे, जेव्हा एखाद्या संघाने सामना 1 रनने जिंकला. 30 वर्षांपूर्वी, कसोटी इतिहासात पहिल्यांदा 1 रनने विजय नोंदवला गेला होता. 23 जानेवारी 1993 रोजी वेस्ट इंडिजने अॅडलेड येथे खेळल्या गेलेल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा अवघ्या 1 रनने पराभव केला होता.
एखाद्या संघाने फॉलोऑन मिळाल्यानंतर सामना जिंकण्याची कसोटी क्रिकेटमधील ही चौथी वेळ आहे. 1894 मध्ये इंग्लंड संघाने असा पराक्रम केला होता. त्या सामन्यात फॉलोऑन खेळून त्यांनी ऑस्ट्रेलियाचा 10 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर 1981 मध्ये फॉलोऑननंतर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला 18 धावांनी मात दिली होती. तर 2001 मध्ये कोलकाता कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 171 धावांच्या मोठ्या फरकाने दणदणीत विजय मिळवला होता.
इंग्लंड विजयी विरुद्ध ऑस्ट्रेलिया : सिडनी, 1894
इंग्लंड विजयी विरुद्ध ऑस्ट्रेलिया : लीड्स, 1981
भारत विजयी विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ईडन गार्डन्स, 2001
न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड : वेलिंग्टन, 2023
1 धाव : वेस्ट इंडिज विजयी विरुद्ध ऑस्ट्रेलिया (1993)
1 धाव : न्यूझीलंड विजयी विरुद्ध इंग्लंड (2023*)
2 धावा : इंग्लंड विजयी विरुद्ध ऑस्ट्रेलिया (2005)
3 धावा : ऑस्ट्रेलिया विजयी विरुद्ध इंग्लंड (1902)
3 धावा : इंग्लंड विजयी विरुद्ध ऑस्ट्रेलिया (1982)
4 धावा : न्यूझीलंड विजयी विरुद्ध पाकिस्तान (2018)
न्यूझीलंडने घरच्या मैदानावर आपला उत्कृष्ट कसोटी विक्रम कायम ठेवला आहे. 2017 पासून न्यूझीलंड संघ घरच्या मैदानावर 11 मालिकांमध्ये अपराजित आहे.