

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंदूरच्या होळकर स्टेडियमवर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (rohit sharma) पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून उतरणार आहे. त्याने येथे दोन कसोटी सामने खेळले असले तरी तो त्यावेळी कर्णधार नव्हता. दरम्यान, इंदूरमध्ये होणारा तिसरा कसोटी सामना रोहितसाठी खूप खास असणार आहे. असे काही रेकॉर्ड आहेत, ज्यावर हिटमॅनची नक्कीच नजर असेल. इतकंच नाही तर तो वैयक्तिक विक्रम तर करेलच पण त्याची बॅट तळपली तर एमएस धोनीचा एक मोठा विक्रम मोडीत निघेल.
रोहितने (rohit sharma) कसोटीत 3320, वनडेमध्ये 9782 आणि टी-20 मध्ये 3853 धावा केल्या आहेत. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याने भारतासाठी 16955 धावा केल्या आहेत, म्हणजेच 17 हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला 45 धावांची गरज आहे. जर त्याने हे लक्ष्य गाठले तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17 हजारांहून अधिक धावा करणाऱ्या भारताच्या निवडक फलंदाजांच्या यादीत सामील होईल. या यादीत पहिल्या क्रमांकावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. ज्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 34357 धावा केल्या आहेत. यानंतर माजी कर्णधार विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. अलीकडेच त्याने 25 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. तिस-या क्रमांकावर राहुल द्रविड आहे. त्याच्या खात्यात 24064 धावा आहेत. या यादीत चौथे नाव सौरव गांगुलीचे आहे, ज्याच्या नावावर 18433 धावा आहेत. पाचव्या क्रमांकावर माजी कर्णधार एमएस धोनी आहे. ज्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17092 धावा आहेत. यानंतर आता रोहित शर्माचा क्रमांक आहे.
धोनीच्या नावावर 17092 धावांना मागे टाकण्यासाठी रोहित शर्मा (rohit sharma) किमान शतक झळकावे लागेल. रोहित सध्या धोनीपेक्षा 138 धावांनी मागे आहे. म्हणजेच यासाठी त्याला मोठी शतकी खेळी खेळाची लागेल. नागपुरात खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात रोहित शर्माने शतक झळकावले असले तरी दुसऱ्या सामन्यात त्याच्या बॅटमधून फारशा धावा झाल्या नाहीत आणि इंदूर कसोटीत मोठी धावसंख्या उभारण्यासाठी तो नक्कीच उत्सुक असेल.