गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हौशी तरुणाईला आवर घालण्यासाठी लाठी चार्ज | पुढारी

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हौशी तरुणाईला आवर घालण्यासाठी लाठी चार्ज

राहाता; पुढारी वृत्तसेवा : तुषार बापू सदाफळ पा. यांच्या वाढदिवसानिमित्त आर. पी. आय. जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे यांनी शहरात आयोजित केलेल्या प्रसिद्ध नर्तिका गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात काही हौशी तरुणाईला आवर घालण्यासाठी पोलिसांनी लाठी चार्ज केला. राहाता शहरातील काही तरुणांच्या मुखातून ‘सबसे कातिल, गौतमी पाटील’ असा एकच जल्लोष ऐकू येत होता. कार्यक्रमाला तरुणाईची अलोट गर्दी झाली.

आयोजक व अंगरक्षकांची तरुणांचा जल्लोष सांभाळण्यास दमछाक होताना दिसले. ऐन भरात आलेल्या या कार्यक्रमात पोलिसांसह आयोजक व अंगरक्षकांकडून कार्यक्रमातील काही तरुणांना लाठ्यांचा प्रसाद देण्यात आला. कार्यक्रमातील अलोट गर्दी सांभाळण्यासाठी पोलिस प्रशासनास यावे लागले. जमलेल्या गर्दीतील काही तरुणांवर लाठी चार्ज करीत पोलिस फौज फाट्याने गौतमी पाटील यांना गाडीतून वाट काढून दिली. दरम्यान, तरुणाईचे मनोरंजन करणार्‍या गौतमी पाटील यांचा कार्यक्रम राहाता शहरात चर्चेत राहिल्याचे बोलले जात आहे.

Back to top button