कार्ला : एकवीरा देवस्थान ट्रस्ट मंडळाच्या 4 जागांसाठी 27 उमेदवार रिंगणात | पुढारी

कार्ला : एकवीरा देवस्थान ट्रस्ट मंडळाच्या 4 जागांसाठी 27 उमेदवार रिंगणात

कार्ला : महाराष्ट्रातील जागृत देवस्थान व कोळी आगरी सीकेपी अशा विविध समाजातील नागरिकांची कुलस्वामिनी म्हणून ओळख असणार्‍या वेहेरगाव येथील श्री एकवीरा देवीच्या श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची निवडणूक 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे. विश्वस्त मंडळाच्या चार जागांकरिता तब्बल 27 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत.

श्री एकवीरा देवीच्या मंदिराचा कारभार मागील अनेक वर्षांपासून ट्रस्टच्या माध्यमातून चालविला जात होता. मात्र, 2015-16 सालामध्ये विश्वस्त व ग्रामस्थांमध्ये वाद निर्माण झाल्याने हा वाद न्यायालयात गेला होता. तदनंतर विश्वस्त मंडळ बरखास्त करत देवस्थानचा कारभार प्रशासनाने ताब्यात घेतला होता. तेव्हापासून सुरुवातीच्या काळामध्ये वडगाव कोर्ट, तहसीलदार व पुणे धर्मदाय आयुक्त अशी समिती स्थापन करून त्या माध्यमातून कारभार चालविला जात होता. नंतरच्या काळामध्ये हा कार्यभार उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश पाहत होते.

भाविक-भक्तांसाठी जागा राखीव
घटनेतील तरतुदीनुसार विश्वस्त मंडळाच्या काही जागा या पदसिद्ध असून काही जागा भाविक-भक्तांमधून भरण्यात येतात. यापैकी पदसिद्ध असलेल्या जागेवर पुजारींमधून संजय गोविलकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली आहे. गावच्या सरपंच या पदसिद्ध पदावर विद्यमान सरपंच अर्चना संदीप देवकर यांचा एकमवे अर्ज आला आहे. तर, गुरव परिवाराच्या तीन पदसिद्ध जागांपैकी दगडू त्रिंबक देशमुख या तक्षिमेतील नवनाथ रामचंद्र देशमुख यांचा एकमवे अर्ज आल्याने वरील तिन्ही जागा बिनविरोध झाल्या आहेत.

गुरव परिवारातील उर्वरित दोन पदसिद्ध जागांपैकी नथू दगडू देशमुख या तक्षिमेतील जागेसाठी ऋषिकेश बाळू देशमुख, महेंद्र अशोक देशमुख, भगवान नथू देशमुख या तिघांनी अर्ज दाखल केला आहे. तर, राघू त्रिंबक देशमुख व कोंडू बहिरू देशमुख या तक्षिमेतील जागेसाठी मारुती रामचंद्र देशमुख, विजय विठ्ठल देशमुख व अमेय विजय देशमुख या तिघांनी अर्ज दाखल केला आहे.

स्थानिक गावातील भाविक या दोन जागांसाठी वेहेरगाव गावातून सोमनाथ रामभाऊ बोत्रे, युवराज शंकर पडवळ, रेश्मा युवराज पडवळ, शरद वसंत कुटे, संजय भिवाजी देवकर, मंगेश विठ्ठल देशमुख, चंद्रकांत हौजी देवकर, नीलेश सहादू बोरकर, संजय भागुजी देवकर, अशोक वसंत कुटे, विनोद मोहन देवकर, निरंजन प्रदीप बोत्रे, मारुती राजाराम देवकर, आकाश बबन माने, विकास काशिनाथ पडवळ, सागर मोहन देवकर, सुनील हुकाजी गायकवाड, मिलिंद दत्तात्रय बोत्रे, मनोहर सदाशिव पडवळ, मधुकर राघु पडवळ, अनिकेत दशरथ देशमुख या 21 जणांनी अर्ज दाखल केले आहेत.

26 फेब्रुवारी रोजी चार जागांसाठी मतदान होणार आहेत. वेहेरगाव गावातील त्वेष्ट भक्तनिवास याठिकाणी सकाळी 9 ते सायंकाळी 4 दरम्यान ही मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. उमेदवारांची अंतिम यादी निरीक्षक तथा निवडणूक अधिकारी एस. एस. पारच यांनी प्रसिद्ध केली आहे.पाण्याअभावी झाडे मोजताहेत शेवटी घटका

Back to top button