पुणे : ‘भावी मुख्यमंत्री’ पोस्टर लावणाऱ्याला शोधून काढावे ; सुप्रिया सुळे यांची मागणी | पुढारी

पुणे : 'भावी मुख्यमंत्री' पोस्टर लावणाऱ्याला शोधून काढावे ; सुप्रिया सुळे यांची मागणी

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  मुंबईत पोस्टरवर ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांचा फोटो लावत सुळे या महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख केला आहे. या पोस्टरवरून सुळे यांनी नाराजी दर्शवली आहे. मुंबई पोलिसांनी पोस्टर लावणाऱ्याचा शोध घेत आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी सुळे यांनी केली. बारामतीत पत्रकारांशी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, हा पोस्टर कोणी लावला, याचा पुरावा असला पाहिजे. या देशात कोणालाही कोणाचेही पोस्टर लावता येणार नाही. एका महिलेचा फोटो पोस्टरवर लावण्याचा अधिकार कोणालाही नाही.

हे पोस्टर अथवा त्याचा फोटो मी पाहिलेला नाही. परंतु पत्रकारांकडून यासंबंधी माहिती मिळाली. ते पोस्टर कोणत्या पक्षाने, व्यक्तिने लावले आहे का याची माहिती मुंबई पोलिसांनी मिळवावी. माझा फोटो विना परवानगी लावण्याचा कोणालाही अधिकार नाही. उद्या तुमच्या कुटुंबातील पत्नी, मुलीचा असा फोटो लागला तर तुम्हाला चालेल का ? असा प्रति प्रश्न सुळे यांनी केला. हे फोटो पहाटेच का लावले जात आहेत, याची चौकशी झाली पाहिजे. विरोधी पक्षनेते अजित पवार व माझे फोटो असलेले पोस्टर यापूर्वी लावण्यात आले होते. त्यातून आमचे खासगी आयुष्य, सुरक्षितता याचा प्रश्न निर्माण होवू शकतो. हा राजकीय विषय नाही, पण याचा पोलिसांनी गांभिर्याने विचार करत संबंधिताचा शोध घ्यावा अशी मागणी सुळे यांनी केली.

इतके बाळबोध नाही

मध्यंतरी जयंत पाटील यांचा त्यांच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावले होते. अजित पवार यांचेही पोस्टर लागत असतात. आता माझे लावण्यात आले आहे. पोस्टरवरून आमच्यात वाद होईल इतके आम्ही तिघे बाळबोध नाहीत. सत्तेतील काही लोक आजकाल काहीही स्टेटमेंट करत आहेत. त्यामुळे पोस्टरवरून वाद होतील असे अजिबात नाही. पोस्टरवर कोणाचेच नाव नसल्याने पोलिसांनी हा विषय गांभिर्याने घ्यावा, असे खासदार सुळे म्हणाल्या.

Back to top button