डोंबिवली : लाकडावर कोरले जय शिवराय अन् तयार केली पुस्तक मांडणी | पुढारी

डोंबिवली : लाकडावर कोरले जय शिवराय अन् तयार केली पुस्तक मांडणी

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तुत्व विचार आणि वागणूक याचे कौतुक सारा महाराष्ट्र करत असताना कल्याणमध्ये मात्र, महाराजांच्या विचारांना मुजरा करण्यासाठी एक अनोखी कल्पना राबविण्यात आली आहे. एका लाकडावर महाराजांचे नाव कोरून त्यात पुस्तके ठेवण्यासाठी मांडणी तयार करण्यात आली असून अनोख्या कलाकृतीचा आविष्कार पाहायला मिळत आहे. त्यामुळे ‘जय शिवराय’ या ब्रीद वाक्यासोबत पुस्तकांचे महत्त्व या माध्यमातून पटवून देण्यात येत आहे.

सर्वत्र महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जात आहे. प्रत्येक जण महाराजांच्या विचारांना उजाळा देऊन त्यांना मानाचा मुजरा करत आहेत. मात्र कल्याण पूर्व येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळामार्फत ‘जरी मरी मंदिर तिसगाव’ या ठिकाणी ४ फूट लांबी आणि ४० फूट रुंदीची एक पुस्तक मांडणी तयार केली आहे. साधारण ३ हजार पुस्तके मावतील अशी ही मांडणी आहे. नागरिकांनी या मांडणीत वाचनीय आणि शालेय उपयोगी पुस्तके आणून ठेवावीत असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले होते. याच आवाहनाला प्रतिसाद देत अनेक नागरिकांनी या मांडणीत पुस्तके आणून ठेवली असून ही मांडणी अत्यंत रेखीव अशी दिसत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून तयार करण्यात आलेल्या या मांडणीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड देखील घेणार असल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर या मांडणीत ठेवण्यात आलेली पुस्तके गरजू विद्यार्थी किंवा सेवादायी संस्थेला विनामूल्य देण्यात येतील असे देखील संस्थेतर्फे नमूद करण्यात आले आहे.

आखीव आणि रेखीव असलेल्या या मंडणीवर कोरलेल्या महाराजांच्या नावामुळे ही मांडणी अधिक उठावदार दिसत आहे. ही मांडणी पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी कल्याण पूर्व येथील तीसाई देवी मैदानावर गर्दी केली असून महाराजांच्या विचाराला खऱ्या अर्थाने मुजरा करण्यात आला असल्याची चर्चा शहरभर रंगली आहे.

हेही वाचा : 

Back to top button