पुणे : महाविकास आघाडीची रॅली; युवा आमदारांचा सहभाग, ठिकठिकाणी पुष्पवृष्टी | पुढारी

पुणे : महाविकास आघाडीची रॅली; युवा आमदारांचा सहभाग, ठिकठिकाणी पुष्पवृष्टी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ युवा आमदारांनी काढलेल्या दुचाकी रॅलीस नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आमदार विश्वजित कदम, आ. रोहित पवार, आ. धीरज देशमुख आणि युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत कसबा गणपती येथून सुरू झालेली ही रॅली पवळे चौक, दारूवाला पूल चौक, दूध भट्टी. डुल्या मारुती. हिंदमाता चौक. पालखी विठोबा चौक, गोविंद हलवाई चौक, कस्तुरी चौक, मक्का मशीद (मोमीनपुरा), शिलाई चौक, साने गुरुजी वसाहत, दांडेकर पूल चौक, दत्तवाडी, अलका चौक, कुमठेकर रस्ता, लक्ष्मी रस्ता, केळकर रस्तामार्गे आर्य सोमवंशी मंगल कार्यालय येथे समाप्त झाली.

रॅलीत अग्रभागी असेल्या उघड्या जीपमधून उमेदवार रवींद्र धंगेकर, कदम, पवार, सरदेसाई, देशमुख नागरिकांना अभिवादन करीत होते. या रॅलीत महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ’जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष करून रॅलीला प्रारंभ झाला. रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी, चौका चौकांत पुष्पवृष्टी करीत स्वागत केले.

नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेने कौल दिला आहे. आता देखील जनता महाविकास आघाडीच्या उमेदवारांनाच कौल देणार आहेत. याचीच भीती मनात असल्याने आज भाजपचे सर्व नेतेमंडळी कसबा मतदारसंघात तळ ठोकून आहेत. कसब्यात धंगेकर यांचाच विजय होणार आहे.

                                                        – धीरज देशमुख, आमदार

कसबा पेठ मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकद सध्या दिसून येत आहे. धंगेकरांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता महाविकास आघाडीचा विजय नक्की आहे. धंगेकर यांची सर्वसामान्यांशी नाळ जोडलेली असल्याने नागरिकांचा कौल त्यांच्या बाजूने आहे.

                                               – वरुण सरदेसाई, युवासेना, सचिव

आजारपणात दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांनी पक्षाला गरज असताना साथ दिली. पण, जेव्हा त्यांच्या कुटुंबाला न्याय देण्याची वेळ आली तेव्हा पक्षाने वेगळेच समीकरण समोर आणले. तसेच, खासदार गिरीश बापट यांनाही आजारपणात प्रचारात आणले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खोट्या बोलण्याला नागरिक कंटाळले आहेत. त्यामुळे धंगेकर यांचा विजय निश्चित आहे.
                                                    – रोहित पवार, आमदार

कसबा पेठ मतदारसंघात संपूर्ण जनता माझ्या पाठीमागे आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यांनी देखील जनता तुमच्या पाठीशी असून, विजयाची माळ तुमच्याच गळ्यात पडणार असल्याचे सांगितले.

                                                       – रवींद्र धंगेकर,
                                            उमेदवार, महाविकास आघाडी

Back to top button