महाशिवरात्र : ओम नमः शिवाय! | पुढारी

महाशिवरात्र : ओम नमः शिवाय!

आज महाशिवरात्र. त्यानिमित्ताने…

आर्य सनातन संस्कृतीत ब्रह्मदेव हे निर्माते, विष्णू हे रक्षणकर्ता आणि शिवशंकर हे पुनर्निर्माणकर्ता मानले जातात. पृथ्वीच्या उत्पत्तीचे परमेश्वर म्हणजे ब्रह्मदेव, स्थितीचे परमेश्वर म्हणजे विष्णू आणि नवीकरणाचे परमेश्वर म्हणजे भगवान शिवशंकर. त्यांना विनाशकर्ता म्हणत नाही तर पुनर्निर्माणकर्ता असे आपण म्हणतो. आपण सर्वजण ब्रह्मा, विष्णू अन् महेश या तीन देवतांचे उपासक आहोत. आपल्या प्रत्येकाच्या घरात गणपती, शिव, हरी, भास्कर, जगदंबा या पंच देवतांची पूजा केली जाते. आपल्या देवघरात या पाचही देवतांची आराधना केली जाते. आपल्याकडे शिव उपासनेला मोठे महत्त्व आहे.

भारतात 12 ज्योतिर्लिंगे आहेत. सोमनाथ (गुजरात), मल्लिकार्जुन (श्रीशैल, आंध्र प्रदेश), महाकाल (उज्जैन, मध्य प्रदेश), अमलेश्वर, ओंकार (मध्य प्रदेश), केदारेश्वर (हिमालय), भीमाशंकर (महाराष्ट्र), काशी विश्वेश्वर (वाराणसी, उत्तर प्रदेश), त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र), वैजनाथ (परळी, महाराष्ट्र), नागनाथ (परभणी, महाराष्ट्र), श्री रामेश्वर (तामिळनाडू), घुश्मेश्वर ज्योतिर्लिंग (महाराष्ट्र) असे भारताच्या संपूर्ण दिशांना 12 ज्योतिर्लिंग असून, ती आपली तीर्थक्षेत्रे आहेत. त्यात इतर राज्यांत सात आणि महाराष्ट्रात पाच ज्योतिर्लिंग आहेत. ही महाराष्ट्राची महत्ता अन् पावित्र्य कुणीही विसरू नये. त्यामुळे महाराष्ट्र हे खूप महत्त्वाचे राज्य म्हणावे लागेल. सर्व पीठांमधून श्री शिव उपासना हीच सर्वश्रेष्ठ धर्म उपासना आहे. म्हणून महाशिवरात्रीचे महत्त्व सगळ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.

ज्ञानोपासना अंतर्मुख होऊन करणे म्हणजे शिवोपासना होय. द्वादश ज्योतिर्लिंगातील प्रत्येक लिंगाची शाळुंका ही यज्ञवेदीची (यज्ञकुंड) आणि लिंग ही यज्ञ – शिखा (अग्नी शिखा) यांची प्रतीके असतात. बारा आदित्य ज्योतींची प्रतीके म्हणजेच 12 ज्योतिर्लिंग एकाच शिवलिगांचे ज्योतीचे (अग्निशिखेचे) 12 विविध ठिकाणी पडलेले हे 12 खंड म्हणजेच ही उभ्या भारत खंडातील ज्योतिर्लिंग क्षेत्रे अन् ज्ञान ज्योतीचेच बारा ठिकाणी प्रसादरूप वाटले गेलेले ज्ञानाचे शिवस्वरूप विद्येचे महाभंडारच याचे भान सर्व शिवोपासकांनी ठेवले पाहिजे. बहिर्मुख होऊन देखावा म्हणून नव्हे, तर अंतर्मुख, अंतर्लिन होऊन केलेली शिवोपासनाच सर्वश्रेष्ठ याचे भान सर्वांनीच राखावे. या सर्व दक्षिण (शृंगेरी), उत्तर (केदारनाथ), पूर्व (जगन्नाथ पुरी), पश्चिम (द्वारका) धर्मपीठांचे मूळ संस्थापक चार पीठांसाठी चार दिशांना चार वेदांचे, चार महावाक्यांचे प्रतीक असणारे चार पीठाचार्य शिष्य आद्य श्री शंकराचार्य हे या कलियुगातील सर्व वंद्य भगवान श्री शंकराचेच अवतार मानले जातात.

महाराष्ट्रात आपण धर्मोपासक हे सर्व श्री ज्ञानोशो भगवान विष्णू:! अशी श्रद्धा, परंपरा भागवत धर्म परंपरेत जोपासतच असतो. कल्याण स्वरूप हे शिवशंकराचे स्वरूप आहे. आपले कल्याण व्हावे अशी ज्यांची इच्छा आहे त्यांनी शिव उपासना केली पाहिजे. मृत्युंजय मंत्र हा शिव उपासाकांचा मंत्र आहे. जो जो जन्माला आला त्यांचे मरण निश्चित आहे, तो अमर होतो म्हणजे या आयुष्यरूपी अडकतो. पण, शिव उपासनेने त्याला अमरत्व प्राप्त होते. शिव उपासकांसाठी प्रत्येक सप्ताहातील सोमवार हा सर्वात महत्त्वाचा असतो.

सोमवार व्रत म्हणून श्री शिवपूजन समयी वैदिक – रुद्र पाठ अथवा श्री शिव महिनमन: स्रोत पाठ करून रुद्राभिषेक म्हणजेच शिव उपासनेचा एक सर्वत्र रूढ उपचार, दिवसभर उपास आणि सायंकालानंतरच शिव प्रार्थना करून उपास सोडणे आणि ‘ओम नम: शिवाय, ओम’ असे ओमकार संपुटासह जपानुष्ठान सतत करीत राहणे हीच नित्य शिवोपासना करणे आवश्यक आहे. सर्व शिव मंदिरांत प्रत्येक सोमवारी दर्शनासाठी तर गर्दी असतेच. कारण, प्रत्येक सोमवार शिवोपासनेचा दिवस म्हणावा लागेल.

सप्ताहातील प्रत्येक सोमवार जसा शिवोपासकांसाठी व्रतानुष्ठान करण्यासाठी महत्त्वाचा आहे, त्याप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवसापूर्वी अमावस्यापूर्वीचा दिवस हा शिवरात्री व्रताचाच असतो. परंतु, चैत्र ते फाल्गुन या 12 महिन्यांच्या 12 अमावस्येच्या पूर्वीचा दिवस कृष्ण चतुर्दशी हे मासिक शिवरात्रीचेच असतात. परंतु, या 12 शिवरात्री दिवसांतील माघ मासातील शिवरात्र मात्र सर्वश्रेष्ठ म्हणून मानली जाते. महाशिवरात्र यादिवशी भारतातील सर्व 12 ज्योतिर्लिंग क्षेत्रातून सर्वाधिक दर्शनार्थींची महायात्रा लोटलेली असते. भारतातच नव्हे, तर भारताबाहेर सर्वत्र विदेशातील सर्व भारतीय धर्मोपासक महाशिवरात्र उत्साहात साजरी करतात. छत्रपती शिवाजी महाराज हेसुद्धा शिवोपासक होते. त्यांनी 12 ज्योतिर्लिंगाची उपासना केली. त्यामुळे शिवोपासना करणार्‍यांची संख्या मोठी आहे. माघ महिन्यातील महाशिवरात्र तर खूप महत्त्वाची आहे आणि शिवोपासक ती उत्साहात साजरी करतात.

– पं. वसंतराव गाडगीळ,
(संस्थापक, शारदा ज्ञानपीठम)

Back to top button