Ravindra Jadeja बनला ‘असा’ विक्रम करणारा पहिला भारतीय! | पुढारी

Ravindra Jadeja बनला ‘असा’ विक्रम करणारा पहिला भारतीय!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ravindra Jadeja : भारताचा स्टार फिरकीपटू रवींद्र जडेजाने दिल्ली कसोटीत मोठी कामगिरी केली. अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यादरम्यान त्याने 250 वा बळी मिळवून इतिहास रचला. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाला बाद करून त्याने हा टप्पा गाठला. याचबरोबर जडेजा आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 250 बळी आणि 2500 धावा करणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. तर इंग्लंडच्या इयॉन बोथमनंतर जगातील दुसरा खेळाडू बनला आहे.

जडेजाने 62 व्या कसोटीत ही कामगिरी पूर्ण केली आहे. तर बोथम यांना 55 कसोटीत अशी किमया साध्य करण्यात यश आले होते. याचबरोबर जडेजा हा कपिल देव, अनिल कुंबळे आणि अश्विन यांच्यानंतर पाचवा भारतीय ठरला ज्याने कसोटीत अडीच हजार धावा आणि अडीचशे विकेट्स पटकावल्या आहेत.

जडेजा (Ravindra Jadeja) हा आयसीसीच्या क्रमवारीत जगातील नंबर वन अष्टपैलू आहे. त्याने दिल्ली कसोटीत 45.5 व्या षटकात उस्मान ख्वाजाला बाद करून 250 विकेट्सचा टप्पा गाठला. त्यानंतर 68 व्या षटकाच्या दुस-या आणि सहाव्या चेंडूवर अनुक्रमे पॅट कमिन्स आणि टॉड मर्फी यांची शिकार करून त्याने पुन्हा एकदा कांगारूंना हिसका दाखवला.

दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या सत्रापर्यंत जडेजाने (Ravindra Jadeja) फक्त एकच विकेट घेतली. उस्मान ख्वाजा जो भारतासाठी धोकादायक बनला होता आणि शतकाकडे वाटचाल करत होता त्याला ऐन मोक्याच्या क्षणी तंबूत पाठवण्यात जडेजाने मोलाची भूमिका पार पाडली. तर तिस-या सत्रात जड्डूने ऑस्ट्रेलियाला दोन धक्के दिले.

जडेजा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील 5 वा यशस्वी गोलंदाज

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील यशस्वी गोलंदाजांच्या यादीत रविंद्र जडेजाच्या नावाचा समावेश झाला आहेतो आता पाचव्या क्रमांकावर पोहचला असून कांगारूंविरुद्ध 14वी कसोटी खेळणाऱ्या या डावखु-या फिरकीपटूला 18.43 च्या प्रभावी सरासरीने आतापर्यंत 73* बळी घेण्यात यश आले आहे.

1. अनिल कुंबळे : 20 सामने : 30.32 च्या सरासरीने 111 विकेट्स
2. आर अश्विन : 20* सामने : 29.21 च्या सरासरीने 100 विकेट्स
3. हरभजन सिंग : 18 सामने : 29.95 च्या सरासरीने 95 बळी
4. नॅथन लियॉन : 24* सामने : 35.71 च्या सरासरीने 95 विकेट्स
5. रवींद्र जडेजा : 14* सामने 18.43 च्या सरासरीने 73 बळी

जडेजा कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा आठवा भारतीय

अनिल कुंबळे : 619
रविचंद्रन अश्विन : 460*
कपिल देव : 434
हरभजन सिंग : 417
झहीर खान: 311
इशांत शर्मा : 311
बिशनसिंग बेदी : 266
रवींद्र जडेजा : 252*

Back to top button