वेल्ह्यात शिक्षणाचा खेळखंडोबा सुरूच | पुढारी

वेल्ह्यात शिक्षणाचा खेळखंडोबा सुरूच

दत्तात्रय नलावडे

वेल्हे : जिल्हा परिषद प्रशासनाच्या उदासीनतेमुळे राज्यातील अतिमागास वेल्हे तालुक्यात प्राथमिक शिक्षणाचा खेळखंडोबा सुरूच आहे. गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी अशी महत्त्वाची पदे रिक्त असल्याने या पदांचा कारभार प्रभारी म्हणून स्थानिक शिक्षक अधिकारी पाहात आहेत. तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा घसरत चालला आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक गावांत विद्यार्थी नाहीत; मात्र शाळा सुरू आहे. शिक्षक कधीही येतात आणि कधीही शाळा सोडून जात आहेत. कामचुकार शिक्षकांवर अंकुश ठेवण्यासाठी शिक्षण विभागाकडे सक्षम यंत्रणा नसल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे. पानशेत धरण भागातील घिवशी गावात विद्यार्थी नाहीत;

मात्र गावातील जिल्हा परिषद शाळा सुरू ठेवण्यासाठी शेजारच्या गावातील एक विद्यार्थी दररोज घेऊन जाऊन शाळेत बसविला जात आहे. या एका विद्यार्थ्यासाठी दरमहा हजारो रुपयांचा पगार शिक्षकाला द्यावा लागत आहे. अशीच गंभीर स्थिती गेल्या आठवड्यात शेजारच्या गावांतील शाळांत पाहून अधिकारी चक्रावून गेले. आंबेगाव बुद्रुकच्या शाळेत एका विद्यार्थ्यासाठी दोन शिक्षक तर वडघर, शिरकोली, माणगाव येथील शाळा भरदुपारीच सोडून सर्व शिक्षक पसार झाल्याचे पाहून अधिकारी चक्रावून गेले.

अनेकदा तक्रार करूनही पंचायत समितीचा शिक्षण विभाग दखल घेत नाही. रायगड जिल्ह्यालगतच्या वरोती, केळदवाडी आदी शाळांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
                                       – रमेश शिंदे, माजी सरपंच, केळद

पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी अशी पदे रिक्त असल्याने या पदांचा कार्यभार प्रभारी अधिकार्‍यांवर देण्यात आला. दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षक वेळेवर जात नाहीत, तसेच लवकर शाळा सोडत असल्याचे प्रकार पुढे आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. कामचुकार शिक्षकांवर नियमांप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे.

                                  – पंकज शेळके, गटविकास अधिकारी, वेल्हे

Back to top button