तू मला खूप आवडतेस; आय लव्ह यू म्हणत ‘त्‍याचा’ धिंगाणा; महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल | पुढारी

तू मला खूप आवडतेस; आय लव्ह यू म्हणत 'त्‍याचा' धिंगाणा; महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

बीड, पुढारी वृत्तसेवा : रस्त्यावर उभा राहून तू मला खूप आवडतेस, आय लव्ह यू असे मोठ-मोठ्याने ओरडत व्यक्तीने एका महिलेची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सायंकाळी बीड शहरातील जालना रोडवर घडला. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बीड शहरातील जालना रोडवर उभे राहून अभिमन्यू जाधव (५६) याने विवाहित महिलेची छेड काढल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी घडला. रोडवर उभे राहून तू मला खूप आवडतेस, आय लव्ह यू असे म्हणत जोर- जोराने ओरडू लागला. त्याचवेळी जाधव याने अश्लील चाळे करत महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर महिलेने डायल ११२ वर कॉल करून बीड शहर पोलिसांना पाचारण केले. या प्रकरणी अभिमन्यू जाधव याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान सदरील जाधव याने २०१६ मध्येही या महिलेची छेड काढली
होती. त्यावेळी महिलेच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्याची दि. १२ जानेवारी २०२३ रोजी न्यायालयात महिलेची साक्ष झाली. त्यानंतर दि. २८ जानेवारी रोजी जाधव याने महिलेला शिवीगाळ केली होती. जाधव याच्यापासून माझ्या जिवाला धोका असल्याचेही महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पीएसआय रमेश गायकवाड हे करीत आहेत.

पोलिसांची तत्परता

पीडित महिलेने डायल ११२ वर कॉल केला आणि काही क्षणात बीड शहर पोलीस त्याठिकाणी दाखल झाले. सदरील प्रकरणात महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक रवी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकातील सय्यद अश्फाक, परझने यांनी तासाभरात आरोपीला ताब्यात घेतले.

Back to top button