Ravindra Jadeja : 5 विकेट अन् फिफ्टी… जडेजाच्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद | पुढारी

Ravindra Jadeja : 5 विकेट अन् फिफ्टी... जडेजाच्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ravindra Jadeja : रवींद्र जडेजाने नागपूरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात वर्चस्व गाजवले आहे. सामन्याच्या पहिल्या डावात त्याने केवळ चेंडूनेच नाही तर बॅटनेही धमाकेदार खेळी साकारली. सामन्याच्या पहिल्या दिवशी त्याने पाच कांगारूं फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. त्यानंतर जडेजाने भारतीय डावात सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत 114 चेंडूंत 7 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. त्याचे हे कसोटी कारकिर्दीतील हे 18 वे अर्धशतक ठरले आहे. या सह त्याने एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे.

‘अशी’ कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू

कसोटी डावात सर्वाधिकवेळा पाच बळी घेणारा आणि अर्धशतक झळकावणारा जडेजा (Ravindra Jadeja) हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत पाच वेळा ही कामगिरी केली आहे. या प्रकरणात, त्याने माजी अनुभवी अष्टपैलू कपिल देव यांना मागे टाकले आहे, ज्यांनी कसोटीत चार वेळा हा पराक्रम केला. या यादीत जडेजा आणि कपिलनंतर रविचंद्रन अश्विन तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने अशी कामगिरी आतापर्यंत तीन वेळा केली आहे.

तसेच, जडेजाने एका कसोटी सामन्यात भारतासाठी सर्वाधिक 50+ धावा आणि 5 बळी घेण्याच्या अश्विनच्या विक्रमाची बरोबरी केली. दोघांनीही आपल्या कसोटी कारकिर्दीत 6-6 वेळा अशी कामगिरी केली आहे. या दोघांनंतर कपिल यांचा क्रमांक लागतो. ज्यांनी आपल्या कसोटी करियरमध्ये चार वेळा 50+ धावा करून आणि 5 बळी घेण्याची किमया केली.

जडेजा (Ravindra Jadeja) आणि पटेल यांच्या खेळीने टीम इंडिया मजबूत

भारताने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फक्त दोन डावखुऱ्या फलंदाजांना स्थान दिले असून दोघांनीही आपली अर्धशतके पूर्ण केली आहेत. ते अजूनही नाबाद आहेत. मोठी गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियाचे अव्वल पाच फलंदाजही भारताच्या सातव्या क्रमांकावर असलेल्या जडेजा आणि नवव्या क्रमांकाच्या अक्षर पटेलइतक्या धावा करू शकले नाहीत. या खेळपट्टीवर डावखुऱ्या फलंदाजांना खेळणे कठीण जाईल, अशी चर्चा होती. पण जडेजा-पटेल यांनी 81 धावांची भागिदारी कसून अशा चर्चांना सुरुंग लावला. दोघांनी कांगारूंच्या फिरकीपटूंचा खरपूस समाचार घेतला आणि टीम इंडियाला मजबूत आघाडीकडे नेले. दुस-या दिवसाअखेर भारताने 321 धावांपर्यंत मजल मारून 144 धावांची आघाडी घेतली.

Back to top button